लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : कासारवाडी येथील नाशिक फाटा चौकातील लूप (रॅम्प) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे नाशिक फाटा येथील वाहतूककोंडी सुटणार आहे. वाहतूक पोलिसांनी परवानगी दिल्याने सर्व खबरदारी व दक्षता घेऊन लूप सुरू करण्यात आला आहे.

सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप अभियंता विजयसिंह भोसले या वेळी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नाशिक फाटा चौकातील पिंपळे गुरवकडून जेआरडी टाटा उड्डाणपुलावरून पुण्याकडे जाण्यासाठी खाली उतरणारा लूप बांधण्यात आला असून, यासाठी दहा काेटींचा खर्च झाला आहे. निगडी-दापोडी रस्त्यावर पुणे महामेट्रोचे काम सुरू असल्याने हा लूप वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

आणखी वाचा-‘सागरमाथा’कडून वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई

लूप बंद असल्याने नाशिक फाटा चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत होती. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे लूप चालू करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. आता महामेट्रोचे काम पूर्ण झाल्याने लूप वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे पुलावरून खाली चौकात येऊन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची सोय होणार आहे. तसेच, पादचाऱ्यांना पुलावर ये-जा करणे सुलभ होणार आहे. चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे म्हणाले की, या पुलामुळे वाहनांची कोंडी दूर होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. वाहतूक नियंत्रक दिव्याचे खांब, सूचनाफलक व दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.

Story img Loader