‘घाशीराम कोतवाल’ नाटकामध्ये ‘घाशीराम’ ही व्यक्तिरेखा साकारली असती तर, मोहन जोशी एवढे मोठे कलाकार झाले नसते, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी रविवारी व्यक्त केली. एका अर्थाने मोहनची कारकीर्द घडण्यामध्ये माझाही खारीचा वाटा आहे, अशी नर्मविनोदी टिप्पणीही त्यांनी केली.
प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांच्या ‘नटखट नट-खट’ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ कथाकार भारत सासणे, ज्येष्ठ नाटय़समीक्षक मंगेश तेंडुलकर, डॉ. वि. भा. देशपांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, मॅजेस्टिक प्रकाशनचे अशोक कोठावळे, भाऊसाहेब भोईर, ज्योती मोहन जोशी आणि जयंत बेंद्रे या वेळी उपस्थित होते.
‘घाशीराम कोतवाल’ नाटकासंबंधी लेखन करताना त्यामध्ये ‘घाशीराम’ ही भूमिका न मिळाल्याचा ठपका माझ्यावर संयतपणे ठेवला आहे याकडे लक्ष वेधत जब्बार पटेल यांनी त्याविषयीचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, हे नाटक रंगमंचावर आणताना नाना फडणवीस आणि घाशीराम कोण करणार हे कलाकार विजय तेंडुलकर यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आधीच ठरले होते. घाशीरामची भूमिका करण्यासाठी तालमीला बोलावले आहे हे मोहन जोशी यांच्या डोक्यात कोणी भरवले हे माहीत नाही. घाशीराम साकारायला मिळत नाही हे समजल्यावर त्यांनी नाटकाच्या तालमीला येण्याचे सोडून दिले. हे एका अर्थाने चांगले झाले. कारण या नाटकामुळे मोहन आगाशे आणि रमेश टिळेकर यांच्यावर बसला तसा शिक्का मोहन जोशी यांच्यावरही बसला असता.
कौटुंबिक पाश्र्वभूमी नसतानाही केवळ कष्ट करण्याची तयारी, जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस मोठा होऊ शकतो हे मोहन जोशी यांनी दाखवून दिले असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले.
उलगडली ‘मोहन’ची विविध रूपे
जयंत तारे यांनी बालनाटय़ातून दिलेली संधी.. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये असल्यापासून रंगमंचावर वावरण्याची इच्छा.. भावांच्या खिशातून चिल्लर ढापून ‘अलका’मध्ये चित्रपट पाहण्याची हौस पुरी करणारा.. किलरेस्कर ऑईल इंजिनमधील नोकरी सांभाळून नाटकात काम करणारा.. अमिताभ बच्चन, धर्मेद्र, माधुरी दीक्षित यांच्यासमोर खलनायक रंगविणारा.. नाटय़ परिषदेच्या कार्यामध्ये रममाण होणारा.. अशी मोहन जोशी यांची विविध रूपे खुद्द मोहन जोशी यांच्यासह अनेकांनी छोटेखानी मुलाखतीतून उलगडली. सुधीर गाडगीळ आणि राजेश दामले यांनी आई प्रमिला जोशी, ज्योती जोशी, कन्या गौरी, भाऊ अविनाश जोशी, जयंत बेंद्रे, भारत सासणे, डॉ. माधवी वैद्य, भाऊसाहेब भोईर, दीपक करंजीकर, अशोक शिंदे यांच्याशी संवाद साधला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा