स्त्रीला एकीकडे आदिशक्ती म्हणायचे व दुसरीकडे तिची उपेक्षा करायची, असे चालणार नाही. देशात पन्नास टक्क्य़ांनी असलेल्या महिलांचा विचार केल्याशिवाय राष्ट्राचा विचार शक्यच नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. महिला हे राजकारण किंवा व्यापाराचे साधन होऊ नये. महिलांविषय कायद्यांचा पुनर्विचार व्हावा, पण समाजात बदल होत नाही तोवर व्यवस्थेत बदल होणार नाही, असेही ते म्हणाले.
सुधा रिसबूड यांनी लिहिलेल्या स्नेहल प्रकाशनच्या ‘भारतीय स्त्री: एक मीमांसा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, लेखिका सुधा रिसबूड आदी उपस्थित होते.
डॉ. भागवत म्हणाले, देशावर विविध आक्रमणे होऊनही भारतीय संस्कृती टिकून राहिली. त्याचे श्रेय आईच्या रूपाने संस्काराची परंपरा पुढे नेणाऱ्या महिलांकडे जाते. महिलांचे जीवन हे केवळ त्यांचे जीवन नाही, तर ते राष्ट्राचे भविष्य आहे. कुटुंब व राष्ट्रजीवनामध्ये महिलेचे स्थान मोठे व आदराचे आहे. तिला बरोबरीने वागविणे गरजेचे आहे. मात्र ही शक्ती गौण झाली आहे. त्याची कारणे शोधून त्यावर उपाय केले पाहिजेत. सुशिक्षित, झोपडपट्टीत राहणारी व ग्रामीण, अशा सर्व महिलांची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाचा वेगळा विचार व्हावा. भारतीय स्त्रीमध्ये सर्व प्रकारच्या क्षमता आहेत. केवळ शिक्षण नव्हे, तर प्रबोधनाने त्यांचे सक्षमीकरण केले पाहिजे. पुरुषांचीही मानसिकता बदलण्यासाठी त्यांचेही प्रबोधन होणे गरजेचे आहे. समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने हे गरजेचे आहे. महिलाविषयक कायद्यांचा पुनर्विचार व्हावा, पण समाजात परिवर्तन होण्याची गरज आहे. या सुधारणांची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून केली पाहिजे.
पुस्तकाबाबत डॉ. भागवत म्हणाले, रिसबूड यांनी लिहिलेल्या पुस्तकात चिंतनाला गती देण्याचे सामथ्र्य आहे. त्यातून महिलाविषयी आणखी चिंतन व्हावे, अशी अपेक्षा आहे.
देगलूरकर म्हणाले, भारतीय संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या विषयाचा विचार व्हावा. कोणत्याही विषयाबाबत इतिहासाची पाश्र्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. वेदकाळात अनेक प्रज्ञावंत स्त्रिया होत्या. स्त्रियांनी कुटुंबाचे जीवन सुरळीत राहण्यासाठी पराकाष्टा केली, त्यातून भारतीय संस्कृती टिकून राहिली. भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा विचार केला, तर महान स्त्रिया निर्माण होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा