स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात सुरू असलेल्या स्वराज्य महोत्सवांतर्गत बुधवारी (१७ ऑगस्ट) सकाळी पिंपरी पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सामूहिक राष्ट्रगीत उपक्रम राबवण्यात आला.गुरूवारी, १८ ऑगस्टपासून दररोज सकाळी १० वाजता पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजता पालिका मुख्यालयात राष्ट्रगीताचे समूहगान झाले. यावेळी स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या क्रांतीवीरांचे, स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यात आले. देशाची एकात्मता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखण्यासाठी निर्धारपूर्वक संकल्प यावेळी करण्यात आला. आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, पदाधिकारी मनोज माछरे, उमेश बांदल आदींसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दरम्यान, महापालिकेकडून यापूर्वी करण्यात आलेल्या घोषणेनुसार गुरूवारपासून पालिकेच्या सर्व कार्यालयांत दररोज सकाळी दहा वाजता राष्ट्रगीत वाजणार आहे. पालिकेच्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये देशाप्रति असलेला आदर अधिक वृद्धिंगत करणे, प्रत्येकाच्या मनात देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि एकात्मतेची ज्योत तेवत ठेवण्याच्या हेतूने राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे. राष्ट्रगीतातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, शिवाय सेवेची भावना वृद्धिंगत होते, असे महापालिका प्रशासनाने यासंदर्भात नमूद केले आहे. पालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये दररोज राष्ट्रगीत वाजवण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कर्मचारी संघाचे अध्यक्ष रूपेश पटेकर यांनी गेल्या वर्षापासून पाठपुरावा केला होता.