मूल्यांकन परिषदेच्या समितीच्या स्वागताची तयारी
घरी ‘महत्त्वाचे’ पाहुणे येणार असले की साफसफाई, घर आवरणे अशी तयारी चालते. तशीच गडबडघाई सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सध्या सुरू आहे. राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेच्या (नॅक) पाहणी समितीच्या स्वागताची जोरदार तयारी सध्या विद्यापीठात सुरू आहे. अगदी इमारतींची रंगरंगोटी, नवे फलक, स्वच्छता याबरोबरच ‘पाहणी समिती येईल तेव्हा शिस्त पाळा,’ अशा सूचनाही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची चर्चा विद्यापीठात आहे.
विद्यापीठाने ‘नॅक’ला दिलेल्या स्वयंमूल्यमापन अहवालातील त्रुटी सध्या चर्चेत असतानाच दुसरीकडे समितीला ‘चकाचक’ विद्यापीठाचे दर्शन घडवण्यासाठी प्रशासन झटत आहे. एरवी सुस्तावलेले अनेक विभाग झपाटय़ाने कामाला लागले आहेत. भिंती, रस्ते, झाडे, पाटय़ा.. सगळीकडे ‘पाहुणे येणार हो..’ असा नारा घुमतो आहे. इमारतीच्या कोपऱ्यातील जळमटे, काही इमारतींच्या जिन्याचे रंगलेले कोपरे असे अनेकांना सवयीचे झालेले दृष्य बदलण्याची खटपट सुरू आहे. उदासवाण्या दिसणाऱ्या काही इमारती नवी रंगरंगोटी लेवून ताज्यातवान्या झाल्या आहेत. विद्यापीठातील प्रमुख विभागांच्या इमारतींच्या भागातील परिसर वर्षभर स्वच्छ असला तरी आता अगदी आडभागही स्वच्छ करण्यात येत आहेत. जेसीबीसारखी यंत्रे लावून काही भागातील कचरा, पालापाचोळा, फांद्या उचलण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या आवारात गेल्यावर नेमके कुठे जायचे असा प्रश्न चेहेऱ्यावर घेऊन हिंडणारे विद्यार्थी आणि नवख्या अभ्यागतांनाही थोडा दिलासा मिळाला आहे. अनेक विभागांवर आता दिसतील अशा पाटय़ा लागल्या आहेत. जुन्या पाटय़ांवरील धूळ साफ झाली आहे. एकीकडे परिसरात ही धामधूम चालू असताना विभागांमधील शिक्षक-कर्मचारी वर्ग आपल्या संख्यात्मक आणि गुणात्मक पुण्याईचे हिशोब लावण्यात मग्न आहेत.
शिस्तीत वागा
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी गणवेश घालणे, सर्वानीच वेळेवर येणे, कामाच्या कालावधीत दिलेल्या विभागातच हजर राहणे, परिसरातील पार हेरून टोळक्यांनी उभे न राहणे या विद्यापीठाची शिस्त राखण्याच्या गोष्टी. वर्षभर ही शिस्त पाळताना मागे-पुढे झाल्यास दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून शिस्तीत वागण्याची सूचनावजा विनंती कर्मचाऱ्यांना केली जात आहे. समितीच्या भेटीच्या दिवशी गणवेशात हजर राहण्याची सूचनाही विशेषत्वाने करण्यात आल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे.
बाकी सगळे समितीच्या भेटीनंतर..
विविध समस्या घेऊन जाणारे विद्यार्थी, कोणत्याही चौकशांसाठी जाणारे अभ्यागत यांना सध्या एकच उत्तर प्रशासनाकडून दिले जात आहे. ही चौकशी निकालाची असो, एखादे प्रमाणपत्र किंवा आवश्यक कागदपत्रे मिळवण्याची असो किंवा नव्या वर्षांच्या प्रवेशाची.. ‘नॅकची पाहणी समिती येणार आहे, ती गेल्यावर बघू..!’ असे उत्तर विद्यार्थ्यांच्या कानी पडत आहे.