ऊर्जा संवर्धनासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) संस्थेला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी (बी.ई.ई.) आणि केंद्र सरकारचे ऊर्जा मंत्रालय यांच्याकडून ऊर्जा संवर्धन क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
या पुरस्काराचे वितरण नुकतेच नवी दिल्ली येथे झाले. केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पियूष गोयल यांच्या हस्ते महाऊर्जाचे महासंचालक आनंद लिमये यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी सचिव, विद्युत मंत्रालय, प्रदीप कुमार सिन्हा आणि सचिव, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, उपेंद्र त्रिपाठी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने राज्यात ऊर्जा संवर्धन कायदा व संबंधित योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाऊर्जास पदनिर्देशित संस्था म्हणून जाहीर केले. महाऊर्जाकडून ऊर्जा संवर्धन कार्यक्रमांतर्गत विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.
श्री. लिमये यांच्या नेतृत्वाखाली ‘महाऊर्जा’ने ऊर्जा संवर्धन कार्यक्रमास विशेष महत्त्व दिले आहे. विविध क्षेत्रांमध्ये ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी योजना राबविण्यात येऊन ऊर्जा बचत व ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येत आहे.
महाऊर्जाच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विविध धोरणात्मक निर्णयांमध्ये नवीन इमारती ग्रीन बिल्डिंग तत्त्वावर उभारण्यास प्रोत्साहन देणे, एल.ई.डी. पथदिव्यांच्या वापरात वाढ होण्यासाठी प्रोत्साहन देणे, शासकीय खरेदीमध्ये ४ व ५ तारांकित उपकरणांचा वापर बंधनकारक करणे, सी.एफ.एल. वरील व्हॅट कमी करणे, ऊर्जा कार्यक्षमता तंत्रज्ञानाचा प्रसारासाठी शासकीय इमारती, नगरपालिका / महानगरपालिकांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविणे; जनजागृती करणे व क्षमता बांधणी कार्यक्रम राबविणे इ. चा समावेश आहे.