पुणे : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिलेखागार आणि विज्ञान संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. प्राचीन रसायनशास्त्र, वैज्ञानिक आणि औद्योगक संशोधन परिषदेची (सीएसआयआर) स्थापना आणि वाटचाल, एनसीएलमधील संशोधन आणि प्रगती याचा वेध या संग्रहालयात घेण्यात आला असून, विज्ञानप्रेमी आणि जिज्ञासूंसाठी हे संग्रहालय मार्गदर्शक ठरणार आहे. एनसीएलच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा कार्यक्रम गुरुवारी (२० फेब्रुवारी) आयोजित करण्यात आला आहे. बायोकॉन समूहाच्या अध्यक्ष डॉ. किरण मुजुमदार शॉ, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि सीएसआयआरचे माजी महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ डॉ. सारिका भट्टाचार्य, एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमात एनसीएलच्या ७५ वर्षांवर आधारित कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच अभिलेखागार आणि संग्रहालयाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भविष्यासाठी उत्तम माहिती स्रोत विकसित करणे, तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शिक्षण, वैज्ञानिक माहिती देण्याच्या उद्देशाने संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

संग्रहालयात तीन विभाग समाविष्ट करण्यात आले आहेत. पहिल्या विभागात प्राचीन भारतीय रसायनशास्त्र, सुगंधी अत्तरनिर्मितीची परंपरा यापासून ते रसायनशास्त्राच्या विकासाची वाटचाल, प्राचीन भारतीय राजवंशांच्या नाण्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. दुसऱ्या भागात सीएसआयआरची स्थापना आणि प्रवास उलगडण्यात आला आहे. १९१६मध्ये स्थापन झालेला भारतीय वैद्यकीय आयोग, १९४२मध्ये डॉ. शांतीस्वरूप भटनागर यांच्या नेतृत्वाखाली झालेली सीएसआयआरची स्थापना, १९५०मध्ये एनसीएलची स्थापना, त्यानंतरच्या काळात रासायनिक विज्ञान, फार्मास्युटिकल्स, उत्प्रेरक तंत्रज्ञान, पर्यावरणीय तंत्रज्ञान आणि संरक्षण संशोधन क्षेत्रात घडवलेले महत्त्वपूर्ण बदल, वैद्यकीय क्षेत्रातील नवकल्पनांद्वारे समाजहिताची पूर्तता करण्यासाठी एनसीएलच्या योगदानाचा वेध, डॉ. शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारविजेते, पद्म पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ, १९४९पासून एनसीएलला भेट दिलेल्या महत्त्वपूर्ण व्यक्ती यांचा समावेश आहे. तिसऱ्या भागात एनसीएलमधील अलीकडील काळातील संशोधन आणि प्रगती यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रमुख सात संशोधन विभागांमध्ये स्वच्छ ऊर्जा, रसायनशास्त्र, शाश्वत रासायनिक उद्योग, कृषी तंत्रज्ञान, जैवइंधन, जैवतंत्रज्ञान अशा क्षेत्रांचा समावेश आहे. १९हून अधिक प्रयोगशाळा आणि उद्योग भागीदारांसोबत हरित हायड्रोजननिर्मिती आणि वितरण, इंधनघट संशोधन, पहिल्या हायड्रोजन इंधनघट कॅटमरन आणि ड्युटरेटेड मिथेनॉल प्रकल्पाचे त्रिमितीय प्रारूप (थ्रीडी) यांचा समावेश आहे.

एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले म्हणाले, ‘अभिलेखागार आणि संग्रहालय एनसीएलच्या उत्कृष्टतेचे, समृद्ध वारशाचे प्रतीक आहे. या माध्यमातून रासायनिक आणि संबंधित विज्ञान क्षेत्रातील प्रयोगशाळेच्या वैज्ञानिक क्षमतांचे दर्शन घडवण्यात आले आहे. तसेच उद्योगांशी भागीदारीतून वैज्ञानिक ज्ञानाचे नावीन्यपूर्ण, जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि शाश्वत तंत्रज्ञानात रूपांतर करून भारताच्या रासायनिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान जाणून घेता येणार आहे.’

Story img Loader