पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार पदवी अभ्यासक्रमात केलेल्या बदलांनंतर आता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातही बदल करण्यात आले आहेत. नव्या आराखड्यानुसार दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील दुसरे वर्ष संशोधनासाठी देता येणार असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा अभ्यासक्रम निवडण्यासह प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण, ऑनलाइन, दूरस्थ, मिश्र शिक्षण यातील पर्याय स्वीकारण्याची लवचिकता देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) पदव्युत्तर पदवीसाठीचा अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा नुकताच जाहीर केला. युजीसीच्या शिफारसीनुसार तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील दुसरे वर्ष निव्वळ संशोधनासाठी देता येऊ शकते. चार वर्षांचा ऑनर्स किंवा संशोधनासह ऑनर्स पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम एक वर्षांचा असेल. त्याशिवाय पाच वर्षांचा एकात्मिक पदवी-पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही देता येऊ शकतो. विद्यापीठांनी मशीन लर्निंग, आंतरविद्याशाखीय विषयांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करावेत.

हेही वाचा : ड्रग्स व्हायरल प्रकरण : फर्ग्युसन रोडवरील अनधिकृत हॉटेलवर पुणे पोलिस आणि महापालिका प्रशासनाची कारवाई

राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता आराखड्यात (एनएचईक्युएफ) ४.५ ते ८ या स्तरात उच्च शिक्षणाची विभागणी करण्यात आली आहे. त्यात पदव्युत्तर पदवी ६, ६.५, आणि ७ व्या स्तरावर आहे. विद्यार्थ्यांना एका विद्याशाखेतून दुसऱ्या विद्याशाखेत प्रवेश घेण्याची लवचिकता मिळेल. तसेच दुहेरी मुख्य विषय घेऊन पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातील कोणताही एक विषय निवडण्याची मुभा असेल. तर मुख्य आणि उपविषय घेऊन पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य किंवा उपविषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. दोन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षानंतर बाहेर पडण्याचा पर्याय असेल. त्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविका प्रदान करण्यात येईल. प्रामाणिकपणा हा संशोधनातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे संशोधनातील चौर्यक्रम शोधण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी सॉफ्टवेअरचा वापर करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा : फर्ग्युसन रस्त्यावरील ‘एल थ्री ’ बारचा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून रद्द

श्रेयांक रचना

पदव्युत्तर पदविका – ४० श्रेयांक
एक वर्षाचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम – ४० श्रेयांक
दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम – ८० श्रेयांक
चार वर्षांच्या पदवीनंतर दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम – ८० श्रेयांक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National education policy 2020 know the ugc changes in post graduate courses pune print news ccp 14 css