पुणे : शिक्षणातील लवचिकतेचा काही विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होतो. पण सगळय़ांसाठीच ते उपयुक्त ठरेल असे नाही, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आशुतोष कोतवाल यांनी व्यक्त केले. अमेरिकेच्या धर्तीवर आखलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील लवचिकतेमुळे विद्यार्थ्यांची मूलभूत कौशल्ये गमावली जाणार नाहीत याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेची प्रत्येक गोष्ट ‘कॉपी’ करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
अमेरिकेतील डय़ूक विद्यापीठात भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. कोतवाल यांनी सध्या देशभरात चर्चा रंगलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील वेगळय़ा पैलूकडे लक्ष वेधले. त्यांच्याच नेतृत्वाखील शास्त्रज्ञांच्या चमूने ‘डब्ल्यू बोसॉन’ या मूलकणाचे अचूकतेने वस्तुमान मोजून मूलकण विज्ञानाचा पायाभूत सिद्धान्त असलेल्या प्रमाण प्रारूप सिद्धान्ताला आव्हान दिले. या संशोधनाचे जगभरात कौतुकही झाले. अलीकडेच पुण्यात आले असता डॉ. कोतवाल यांच्याशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला. यावेळी त्यांनी संशोधन, बिग बँग थिअरी, क्वाण्टम तंत्रज्ञान, आदित्य एल १ मोहीम, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अशा विविध विषयांवर भाष्य केले.
हेही वाचा >>> जेजुरीच्या खंडोबा गडावर घटस्थापना, उत्सवमूर्ती गाभाऱ्यात
भारतातील सध्याच्या पद्धतीनुसार विज्ञान, गणित, भाषा अशा काही विषयांची कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतात. शिक्षणातील लवचिकता सगळय़ांसाठीच उपयुक्त ठरेल असे नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये काही मूलभूत कौशल्ये विकसित होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची मूलभूत कौशल्ये गमावली जाणार नाहीत याकडे लक्ष दिले पाहिजे, असे डॉ. कोतवाल यावेळी म्हणाले.
चंद्रयान ३ च्या यशानंतर भारताची ‘आदित्य एल १’ मोहीम वैज्ञानिकदृष्टय़ा महत्त्वाची आहे. सूर्याच्या अभ्यासातून सौर वादळे, सौर उत्सर्जन अशा विविध घटकांचा अभ्यास केला जाणार असल्याचे डॉ. कोतवाल म्हणाले.
हेही वाचा >>> पुण्यातील ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळ परिसरात कडक बंदोबस्त
अमेरिकेत वैज्ञानिक संशोधनासाठीची पूरक परिसंस्था (इकोसिस्टिम) विकसित झाली आहे. भारतातही ती निर्माण होणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी मांडले.
लवचिक आणि सर्वस्पर्शी शिक्षण पद्धतीचा एक धोका दिसतो, की कोणत्याही एका विषयाचे प्रावीण्य आणि अधिकार आत्मसात होण्यास पूर्ण वाव मिळत नाही. असे लवचिक आणि सर्वस्पर्शी शिक्षण प्राथमिक आणि पूर्वमाध्यमिक शालेय काळात अवश्य दिले जावे. पुढील कालखंडात मात्र विद्यार्थ्यांचा कल आणि क्षमतेप्रमाणे निवड करण्याची संधी देणारी शिक्षणपद्धती असावी. – डॉ. आशुतोष कोतवाल, ज्येष्ठ शास्त्रज्ञ