पुणे : उच्च शिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली असताना आता येत्या शैक्षणिक वर्षात पूर्वप्राथमिक स्तरावरही धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तके राज्यातील १ लाख ३१ हजार अंगणवाड्यांना पुरवली जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंत पूर्वप्राथमिक शिक्षणाचा समावेश औपचारिक शिक्षणामध्ये करण्यात आला नव्हता. त्यामुळे अक्षरांची तोंडओळख, गाणी, गोष्टी, खेळ अशा स्वरूपात शैक्षणिक प्रक्रिया चालत होती. मात्र, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शैक्षणिक चौकटच बदलण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वप्राथमिक शिक्षणाचा औपचारिक शिक्षणात समावेश झाला आहे. पूर्वप्राथमिक शिक्षणात पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान महत्त्वाचे मानण्यात आले आहे. या अनुषंगाने धोरणात प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) पूर्वप्राथमिक किंवा पायाभूत स्तरासाठीचा अभ्यासक्रम आराखडा तयार केला. या आराखड्यानुसार राज्य स्तरासाठीच्या अभ्यासक्रमाची राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) निर्मिती केली आहे. तर बालभारतीकडून पाठ्यपुस्तकांची निर्मिती, छपाई करून अंगणवाड्यांना पुस्तके वितरित केली जाणार आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणातील होत असलेल्या बदलांपाठोपाठ आता पूर्वप्राथमिक स्तरापासूनचे बदल सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – धक्कादायक : प्रेयसीने संपर्क तोडल्याने तिच्या बहिणीवर गोळीबार

येत्या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची राज्यातील पूर्वप्राथमिक स्तरावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात शासकीय अंगणवाड्यांपासून केली जाणार आहे. त्यात १ लाख ३१ हजार अंगणवाड्यांना अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके पुरवली जाणार आहेत. पहिल्यांदाच पूर्वप्राथमिक स्तरावर औपचारिक अभ्यासक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. तर पूर्वप्राथमिक स्तरासाठीची पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर पाठ्यपुस्तकांची छपाई करून ती अंगणवाड्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत, असे बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्ववत होताच पालकांचा नोंदणीला तुफान प्रतिसाद…किती अर्ज झाले दाखल?

पुस्तकांसमवेत प्रशिक्षणही महत्त्वाचे…

अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके देणे उपयुक्त ठरणार आहे, पण त्यासोबत शिक्षकांचे प्रशिक्षणही महत्त्वाचे आहे. त्यातून या स्तरावर अपेक्षित असलेले बदल साध्य करता येतील, असे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी सांगितले. बालवाडीच्या स्तरावर विद्यार्थ्यांचा मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास होत असतो. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पंचकोश पद्धती स्वीकारली आहे. त्यानुसार तयार केलेली पुस्तके शिक्षकांना दिली जाणार आहेत, असे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National education policy in 1 lakh 31 thousand anganwadi in maharashtra what will happen now pune print news ccp 14 ssb
Show comments