पुणे : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (युजीसी-नेट) जाहीर केला. देशभरातील उमेदवारांचे या परीक्षेच्या निकालाकडे लक्ष लागले होते. एनटीएने या परीक्षेचा निकाल काही दिवस पुढे ढकलला होता. विद्यापीठांसह उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहायक प्राध्यापक पदी नोकरी मिळविण्यासाठी एनटीएतर्फे युजीसी नेट परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा ६ ते १४ डिसेंबर या कालावधीत, तसेच १९ डिसेंबर रोजी देशभरातील २९२ शहरांत घेण्यात आली. परीक्षेसाठी ९ लाख ४५ हजार ८७२ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील ६ लाख ९५ हजार ९२८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती.
हेही वाचा >>> सरकारने सुटी जाहीर केली, परीक्षा पुढे ढकलली गेली
एनटीएने जाहीर केलेल्या निकालानुसार एकूण ८३ विषयांमध्ये ५३ हजार ७६२ उमेदवार सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत. तर ५ हजार ३२ उमेदवारांना सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र होण्यासह कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्तीही मिळाली आहे. एनटीएकडून या परीक्षेचा निकाल १० जानेवारीला जाहीर करण्यात येणार होता. मात्र मिचौंग चक्रीवादळामुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नव्हती. त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे निकाल पुढे ढकलण्यात आल्याचे एनडीएकडून जाहीर करण्यात आले होते. देशभरातील उमेदवारांचे या परीक्षेच्या निकालाकडे लक्ष लागले होते.