प्रकाशन व्यवसायात पन्नास वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणारे राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांना ‘द फेडरेशन ऑफ पब्लिशर्स अँड बुकसेलर्स असोसिएशन इन इंडिया’ या संघटनेतर्फे सुवर्ण पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात राजहंस प्रकाशनच्या संचालिका रेखा माजगावकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रकाशन क्षेत्रातील प्रदीर्घ आणि देदीप्यमान कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.
हेही वाचा >>> VIDEO : ना रस्ता, ना रुग्णवाहिका! उपचारासाठी ५५ वर्षीय महिलेचा सहा किलोमीटर झोळीतून प्रवास
माजगावकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली राजहंस प्रकाशन गेली ५५ वर्षे वाटचाल करीत आहे. या कालावधीत माजगावकर यांच्या कल्पनेतून आणि कर्तबगारीतून अनेक अभिनव उपक्रम राबविले. चरित्र, आत्मचरित्र, कथा-कादंबरी, काव्य, ललित लेखन, विज्ञान, कला अशा विविध विषयांवर अनेक प्रथितयश त्याचबरोबर नवोदित लेखकांनी लिहिलेली शेकडो पुस्तके माजगावकर यांच्या कारकिर्दीत प्रकाशित झाली. प्रकाशन क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकीचे सजग भान ठेवणारा प्रकाशक असा लौकिक माजगावकर यांना लाभला आहे. विधायक कामात सहभागी असलेल्या अनेक संस्थांना माजगावकर यांनी भरीव आर्थिक सहाय्य केले आहे.