पुणे : प्रत्येक गणेश मंडळाला १०० वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक लावण्यास राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली असून, ढोल-ताशा पथकात ३० पेक्षा जास्त वादकांचा समावेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.गणेशोत्सवातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर, डॉ. कल्याणी मांडके यांनी लवादाकडे याचिका दाखल केली होती. यात राज्य सरकार, जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे महापालिका आणि पुणे पोलिसांना प्रतिवादी करण्यात आले होते. पुण्यात गणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर राष्ट्रीय हरित लवादाच्या पश्चिम विभागीय खंडपीठाने शुक्रवारी आदेश दिले. त्यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळासह पुणे पोलिसांना ध्वनिप्रदूषण कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्येक गणेश मंडळाच्या मंडपाच्या परिसरात तीन ठिकाणी दररोज ध्वनिप्रदूषणाची पातळी मोजावी. प्रत्येक गणेश मंडळाच्या मंडपात दर्शनी भागात दोन ठिकाणी फलक लावून आधीच्या दिवसाची ध्वनिप्रदूषणाची पातळी लिहावी. या फलकांवर मर्यादेपेक्षा जास्त आवाज आरोग्यासाठी धोकादायक आहे, असेही लिहावे. हे सर्व करण्यासोबत त्यासाठी खर्च करण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर असेल,’ असे लवादाने आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा…हर्षवर्धन पाटील यांची महायुतीतील नेत्यांवर नाराजी, इंदापूरमधून निवडणूक लढविण्यावर ठाम; लवकरच निर्णय

१०० वॉटपेक्षा जास्त क्षमतेच्या ध्वनिक्षेपकांवर बंदी

प्रत्येक गणेश मंडळाला १०० वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलिसांशी चर्चा करून गणेश मंडळाचे ठिकाण पाहून ही क्षमता ठरवावी. यात मंडपाचा आकार आणि परिसरातील शाळा, रुग्णालये, निवासी इमारतींचा विचार करावा, असेही लवादाने नमूद केले आहे.

हेही वाचा…पोलीस उपायुक्त नवटक्के यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास ‘सीबीआय’कडे? ‘बीएचआर’ पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरण

राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश

-गणेश मंडळाच्या मंडपात आधीच्या दिवसाची ध्वनिप्रदूषाची पातळी दर्शविणारे फलक
-प्रत्येक मंडळाच्या मंडपात ध्वनिप्रदूषणाबाबत इशारा देणारे फलक
-ढोल-ताशा पथकात ३० पेक्षा जास्त वादकांना मनाई
-विसर्जन मिरवणुकीवेळी मुख्य चौकात ध्वनिप्रदूषणाची पातळी दर्शविणारे डिजिटल फलक
-विसर्जन मिरवणुकीत डीजेवर बंदी
-विसर्जन मिरवणुकीनंतर ७ दिवसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची नावे वृत्तपत्रांतून जाहीर करावीत.