पुणे : महाकवी कालीदासांची नगरी उज्जैन येथील अभिनव रंगमंडळ संस्थेच्या वतीने ज्येष्ठ रंगकर्मी आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक वामन केंद्रे यांना राष्ट्रीय अभिनव रंग सन्मान जाहीर झाला आहे.अभिनव रंगमंडळ संस्थेच्या ४० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून १५ ऑक्टोबर रोजी उज्जैन येथे आयोजित राष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात केंद्रे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ५१ हजार रूपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नाट्य दिग्दर्शनात केलेले धाडसी आणि पथदर्शी प्रयोग, भारतीय रंगमंचावर निर्माण केलेली रंगभाषा, आधुनिक नाट्य प्रशिक्षणात दिलेले अमूल्य योगदान, देशभर घडवलेले हजारो कलाकार, रंगभुमी संदर्भातील संशोधन, उभ्या केलेल्या महत्त्वाच्या नाट्यसंस्था आणि प्रस्थापित संस्थांच्या विकासामध्ये केलेले अनोखे योगदान या गोष्टींचा विचार करून केंद्रे यांची या पहिल्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. भारतीय रंगभूमीच्या विकासात सुरू केलेले पायाभूत उपक्रम आणि भारतीय रंगभूमीला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देण्यामध्ये केंद्रे यांचे योगदान आहे. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी साक्षात कालीदासांचा आशिर्वादच आहे, अशी भावना वामन केंद्रे यांनी व्यक्त केली.  

Story img Loader