पुणे : देशातील ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडण्यात आल्याने डिजिटल क्रांती ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे, असा दावा राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्थेचे महासंचालक डॉ. जी. नरेंद्र कुमार यांनी येथे केला. देशातील सत्तर टक्के ग्रामपंचायती डिजिटल झाल्याचेही त्यांनी सांगितले.

कृषी बँक व्यवसायातील आंतरराष्ट्रीय सहकार आणि प्रशिक्षण केंद्राच्या सहकार्याने वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (वामनिकॉम) येथे आयोजित ‘सिकटॅब आंतरराष्ट्रीय परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन डॉ. जी. नरेंद्र कुमार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आशिया पॅसिफिक रुरल अँड ॲग्रीकल्चर क्रेडिट असोसिएशनचे (ॲप्राका) सरचिटणीस प्रसूनकुमार दास, एन. सी. यू आयच्या उपमुख्य कार्यकारी सावित्री सिंग, श्रीलंकेतील सनासा इंटरनॅशनल संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका समाधिनी किरीवंदेनिया, नागपूर आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, वॅमनिकॉमच्या संचालिका डॉ. हेमा यादव यावेळी उपस्थित होते. ‘सहकारातून समृध्दी : डिजिटल नावीन्यता आणि मूल्य साखळी’ असा मध्यवर्ती विषय असलेल्या या परिषदेत ‘सार्क’ समूहातील नेपाळ, नांमबिया, श्रीलंका, भूतान, मॉरिशस, झांबियासह १५ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

‘देशातील ७० टक्के ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरने जोडल्याने ग्रामीण भागापर्यंत डिजिटल क्रांती पोहचली आहे. सहकारी संस्था, ग्रामपंचायत आणि बचत गट यांच्या एकत्रीकरणामुळे देशात सहकाराचे जाळे वाढत आहे. ग्रामीण भागात सहकाराच्या माध्यमातून अर्थव्यवस्था मजबूत होत असून ग्रामीण भागाला विकासाच्या प्रक्रियेत आणून तेथील प्रगती आता वेगाने करणे शक्य आहे, असे डॉ. जी. नरेंद्र कुमार यांनी सांगितले. प्रसूनकुमार दास म्हणाले, ‘सहकार क्षेत्रातील क्रांतीमुळे ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. डिजिटल क्रांतीमुळे शहर आणि खेडी जोडली गेली आहेत. डिजिटल क्षेत्रात होणाऱ्या संशोधनामुळे सहकार क्षेत्राला ताकद मिळाली आहे.’ डॉ. शंतनू घोष यांनी आभार मानले.

Story img Loader