भारतीय चित्रपटाच्या शताब्दी वर्षांचे औचित्य साधून ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’तर्फे (एफटीआयआय) १९ ते २४ एप्रिल या कालावधीत पहिला राष्ट्रीय विद्यार्थी लघुपट महोत्सव (स्टुडंटस् फिल्म फेस्टिव्हल) आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव स्पर्धात्मक असून विजेत्या विद्यार्थ्यांना विविध विभागांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या महोत्सवामध्ये ४३ संस्थांचा सहभाग असून १०४ विद्यार्थी लघुपट पाहण्याची संधी लाभणार आहे. त्यासाठी शॉर्ट फिक्शन, नॉन-फिक्शन आणि अॅनिमेशन असे तीन विभाग करण्यात आले असून त्याअंतर्गत ६० लघुपट स्पर्धात्मक विभागामध्ये समाविष्ट आहेत. या महोत्सवामध्ये एफटीआयआय, सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट (कोलकत्ता), एल. व्ही. प्रसाद, मुद्रा इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन्स (अहमदाबाद), नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाईन्स, व्हिसिलग वूडस् इंटरनॅशनल, माया अॅकॅडमी ऑफ अॅडव्हान्स्ड सिनेमॅटिक्स (मुंबई), रामोजी अॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन (हैद्राबाद), सृष्टी स्कूल ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (बेंगळूरु), स्कूल ऑफ कम्युनिकेशन, डून युनिव्हर्सिटी आणि रिलायन्स एम्स (पुणे) या संस्थांतील विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या लघुपटांचा समावेश असल्याची माहिती ‘एफटीआयआय’चे संचालक डी. जे. नारायण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
एफटीआयआय येथे चार ठिकाणी लघुपट दाखविण्याची सुविधा आहे. या महोत्सवात प्रादेशिक भाषांतर्गत मराठीतील लघुपटांचे स्वतंत्र स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. दिग्दर्शन, छायालेखन, संकलन, ध्वनिसंयोजन, पटकथालेखन, अभिनय, प्रॉडक्शन या विभागामध्ये सवरेत्कृष्ट ठरणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रत्येकी एक लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी राज्य सरकारने २५ लाख रुपयांचे सहकार्य केले आहे. याबरोबरच परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्याख्यान आणि कार्यशाळेच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांचा लघुपट निर्मात्यांशी संवाद होणार असल्याचे नारायण यांनी सांगितले.