शहराध्यक्षपदासह पक्षातील इतर पदे लवकरात लवकर भरून पक्षसंघटना मजबूत करा, या शरद पवार यांनी दिलेल्या आदेशानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाबाबत पुन्हा जोरात चर्चा सुरू झाली आहे. शहराध्यक्षपदासाठी नीलेश निकम, श्रीकांत पाटील यांच्यासह अंकुश काकडे, अप्पा रेणुसे, मंगेश गोळे, डॉ. दिलीप घुले, रवींद्र माळवदकर यांच्याही नावाची चर्चा पक्षात ऐकायला मिळत आहे.
पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शनिवारी शरद पवार यांनी पक्षसंघटनेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. जी पदे रिक्त आहेत ती आपापसात एकमत करून लवकर भरा आणि शहरात पक्षाची चांगली संघटना उभी करा, अशी सूचनाही या बैठकीत पवार यांनी केली. पक्षाध्यक्षांनी दिलेल्या या आदेशानंतर राष्ट्रवादीमध्ये शहराध्यक्ष कोण होणार याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे. यापूर्वी जेव्हा अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली होती, त्यावेळी सुरुवातीला अनेक नावे संभाव्य म्हणून चर्चेत आली. मात्र, शेवटी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नीलेश निकम आणि माजी नगरसेवक श्रीकांत पाटील यांच्यात चुरस असल्याचे चित्र निर्माण झाले होते. यांच्यातील कोणीतरी अध्यक्ष होईल असे वातावरण तयार झालेले असतानाच अचानक शहर कार्यकारिणी जाहीर झाली आणि अध्यक्ष निवडीचा विषय थांबला.
पदाधिकाऱ्यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीनंतर इच्छुकांची मोर्चेबांधणी पुन्हा सुरू झाली असून निकम, पाटील यांच्यासह म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष, नगरसेवक अप्पा रेणुसे, मंगेश गोळे, माजी शहराध्यक्ष, नगरसेवक रवींद्र माळवदकर, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. दिलीप घुले यांचीही नावे आता चर्चेत आली आहेत.
यातील कोणीही प्रत्यक्ष स्वत:चे नाव जाहीर केले नसले, तरी ही नावे इच्छुकांमध्ये असल्याचे अनेक नगरसेवकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून रविवारी समजले. उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी काही कार्यक्रमांसाठी पुण्यात होते. यावेळी काही इच्छुकांनी त्यांचे लक्ष वेधल्याचे कार्यक्रमात पाहायला मिळाले. काहींनी त्यांची भेट घेतल्याचे, चर्चा केल्याचेही समजते. काही इच्छुकांनी गाठीभेटी सुरू केल्या असून पक्षातील पदाधिकाऱ्यांना फोन करून तयारी सुरू केली आहे, तुम्ही लक्ष ठेवा असे सांगायला सुरुवात केली आहे.
शहराध्यक्षासह विद्यार्थी आणि युवक अध्यक्ष या अन्य पदांचा उल्लेखही शरद पवार यांनी बैठकीत आवर्जून केला. त्यामुळे उर्वरित दोन पदांसाठी देखील आता पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाला पूर्णवेळ देणारा कार्यकर्ता आवश्यक असून वेळ देण्याच्या मुद्यावर पवार यांनी भर दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा