शुक्रवार पेठेतील एका व्यापाऱ्याला मंडळाला वर्गणी देण्यासाठी धमकावल्याच्या आरोपावरून बाजीराव रस्त्यावरील नातुबाग मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रमोद विठ्ठल कोंढरे (रा. सदाशिव पेठ) यांच्यासह मंडळाच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कोंढरे हे भारतीय जनता पक्षाचे शहर चिटणीसही आहेत.
महंमद रफिक खान (वय २६, रा. मिठानगर, कोंढवा) या व्यापाऱ्याने या प्रकरणी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. शुक्रवार पेठेतील वर्धमान हाईट्स या इमारतीमध्ये त्यांचे माय होम फर्निचर नावाचे दुकान आहे. खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी दुपारी एकच्या सुमारास कोंढरे व मंडळाचे पाच ते सहा कार्यकर्ते खान यांच्या दुकानात गेले. त्यांनी खान यांच्याकडे पाच हजार रुपयांच्या वर्गणीची मागणी केली.
पाच हजार रुपये देण्यास असमर्थता दाखवित खान यांनी दीड ते दोन हजार रुपयांची वर्गणी देण्याची तयारी दाखविली. मात्र, कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने पाच हजारांची मागणी केली. ‘वर्गणी दिली नाही, तर तुझे दुकान बंद कर. अन्यथा दुकान तोडून टाकू’ अशी धमकी खान यांना देण्यात आली. त्यानुसार त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सहायक पोलीस निरीक्षक ए. व्ही. इप्पर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Story img Loader