होळी आणि रंगपंचमीला खेळल्या जाणाऱ्या रंगांच्या सुरक्षिततेवरील प्रश्नचिन्ह..ते पाण्यात मिसळून खेळताना होणारा पाण्याचा अपव्यय..आणि रंग खेळून झाल्यावर ते त्वचेवरून नीट धुवून काढताना लागणारे भरपूर पाणी.. या सगळ्या समस्यांवर कर्नाटकातील ‘वनस्त्री’ या सामाजिक संस्थेने नामी उपाय शोधून काढला आहे.
या संस्थेने तांदळाचे आणि बेसनाचे पीठ वापरून नैसर्गिक रंग तयार केले आहेत. पुण्यातील घोरपडे पेठेतील प्रगती महिला बचत गटाने या रंगांचे पॅकेजिंग केले असून ‘ऑल फॉर अ स्माईल’ ही संस्था या रंगांचे वितरण करीत आहे. ‘नेचर्स स्पॅश’ या नावाने हे रंग विक्रीस उपलब्ध आहेत.  
कृत्रिम रंगांमध्ये लेड ऑक्साईड, कॉपर सल्फेट, अॅल्युमिनम ब्रोमाईड, मक्र्युरी सल्फाईट असे रासायनिक घटक असण्याची शक्यता असल्यामुळे त्यांमुळे आरोग्यास अपाय होऊ शकतो. ‘ऑल फॉर अ स्माईल’च्या सहसंस्थापक सुरभी साठे म्हणाल्या, ‘‘वनस्त्री संस्थेने बनविलेल्या रंगांमध्ये तांदळाचे पीठ आणि बेसन पीठ हे घटक प्रामुख्याने वापरण्यात आले आहेत. पिवळ्या रंगासाठी हळद आणि बेसन, केशरी रंगासाठी हळद, बेसन आणि फुलांपासून बनविलेले कुमकुम, निळ्या रंगासाठी ‘इंडिगो’ हे फूल व तांदळाचे पीठ आणि लाल रंगासाठी कुमकुम, ‘बेलिगरा’ ही वनस्पती आणि तांदूळ पिठी असे घटक वापरण्यात आले आहेत. हे रंग डोळ्यांत किंवा प्रसंगी पोटात जरी गेले तरी कोणताही अपाय होणार नाही. पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात या रंगांची तपासणी करून घेण्यात आली असून त्यात ते आरोग्यास सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे रंग कोरडे असून पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे ते खेळताना पाणी वाया जात नाही. तसेच  रंग नैसर्गिक असल्यामुळे ते त्वचेवरून चटकन काढता येतात. ’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा