माळीण दुर्घटनेच्या कारणांवरून वाद सुरू असतानाच भारतीय भूशास्त्र सर्वेक्षणाच्या (जीएसआय) वरिष्ठ पथकाने यामागची कारणे शोधली आहेत. त्यांच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार, या दुर्घटनेमागे डोंगराचा अतिशय तीव्र उतार व अन्य नैसर्गिक गोष्टींचाच प्रमुख वाटा आहे. मानवी हस्तक्षेपाचा परिणाम फारसा नाही.
माळीण दुर्घटनेमागे नैसर्गिक की मानवनिर्मित कारणे आहेत, याबाबत वाद आणि आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पाश्र्वभूमीवर जीएसआयचे महासंचालक हरबन्ससिंग, नॅशनल मिशन हेड एम. राजू तसेच, पुणे, नागपूर कार्यालयांचे संचालक, जीएसआयच्या दरडी विभागातील भूशास्त्रज्ञ यांच्या पथकाने शनिवारी माळीण गावाची भूशास्त्रीय अंगाने पाहणी करून दुर्घटनेच्या प्रमुख कारणांचा मागोवा घेतला.
या पाहणीनंतर असे स्पष्ट झाले की, या दुर्घटनेमागे नैसर्गिक कारणांचाच प्रमुख वाटा आहे. गाव ज्या डोंगरावर वसले होते त्याचा उतार ४५ अंशांपेक्षा जास्त होता. तेथे काळा पाषाण (बेसॉल्ट) हाच खडक व लाल माती आहे. घटनास्थळाची स्थिती पाहता झाडे तोडल्यामुळे किंवा जमिनीचे सपाटीकरण केल्यामुळे इतकी मोठी दुर्घटना होणे शक्य नाही. त्यामागे प्रामुख्याने भूशास्त्रीय कारणेच आहेत. दुर्घटनेच्या दिवशी व आधी पडलेल्या जोरदार पावसामुळे त्यात भर पडली. तेथील खडकाला काही भेगा पडल्या होत्या का, या गोष्टी गावकऱ्यांकडून जाणून घेण्यात येत आहेत. याबाबतचा प्राथमिक अहवाल तातडीने केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान, मदतकार्य आणि लोकांच्या पुनर्वसनाबाबत उपाय सुचविण्याकरीता दोन-तीन शास्त्रज्ञांचे एक पथक मार्गदर्शन करत आहे.

Story img Loader