अ‍ॅस्टर, डेझी, झिनिया, सिल्विया, पिटुनिया यासारखी फुले बागेत रंगांची उधळण करतात. ऋतुमानानुसार फुलणारी विविध रोपं आपण बागेत लावू शकतो.

काही फुले खूप सुंदर दिसतात पण त्यांची नावे विचित्र. नाजूक सुंदर फुलांचे नाव मात्र ‘ड्रॅगन फ्लॉवर’. याची रोपं वाटिकेत मिळतात. खरे तर याचे छोटे तुरे म्हणजे जणू फुलांची दीपमाळ! पिवळा, लिंबोणी, केशरी, पांढरा अशा अनेक रंगांची फुले येतात. रोपांची लागवड जवळजवळ केल्यास छान दिसते. वाफा कुंडी अथवा बांबू टोपलीतही छान येते. फुले येऊन गेल्यावर तुरा खुडला तर परत छान फूट येते. पण रोपं तशी नाजूक, फार उष्ण, कोरडय़ा हवेत तग धरतीलच असे नाही.

पेंटास त्यामानाने दणकट प्रकृतीचा. एकदा रोप लावले की दीर्घकाळ फुले येत राहतात. कुंडीत रोप छान छान वाढतात. झाड दोन-तीन फूट उंच वाढते, पण बुटके ठेवल्यास भरगच्च फुलांच्या गुच्छांनी डवरून डाते. याची फुले नाजूक पाच पाकळ्यांची म्हणून नाव पेंटास. पांढऱ्या, जांभळ्या, गुलाबी रंगांच्या नाजूक फुलांचे गुच्छ छान दिसतात. फुले येऊन गेल्यावर छाटणी करावी, माती खुरपून मोकळी करावी. थोडी माती कमी करून नवीन सेंद्रिय माती, दोन मुठी नीमपेंड घालावी. नवी फूट जोमाने येईल. पेंटास दीर्घजीवी आहे. ज्यामुळे दोन-चार रोपं जरून लावावीत. ज्याने बाग ‘सदाबहार’ राहील.

ज्येष्ठ गीतकार हसरत जयपुरी यांचे सुंदर गाणे आहे. ‘तेरे खयालों मे हम’. हा खयाल, विचार म्हणजे फ्रेंच भाषेत ‘पेन्स’ म्हणूनच नाजूक सुंदर फुलांना नाव मिळाले ‘पॅन्सी’. पॅन्सीची फुले फार लोकप्रिय. याचा आकार चेहऱ्यासारखा चार पाकळ्या वरती अन् एक पाकळी खाली. मध्ये सुंदर गडद रंग. अनेक फुलांचे संकर करून ही फुले तयार झाली. रंगांची विविधता इतकी की केशरी, पांढरा, पिवळा, जांभळा, चॉकलेटी तर आहेतच पण काळ्या रंगाची फुलेदेखील आहेत. अमेरिकेत पांढरी शेवंती व काळ्या पॅन्सीने ‘सॉकर’ पुष्परचना तयार करतात म्हणून पॅन्सीला ‘फुटबॉल फ्लॉवर’ म्हणतात. पॅन्सीची रोपे वाटिकेत मिळतात. फुले येऊन गेल्यावर बी धरून नवीन रोपं करता येतात. रोप लावताना वाफ्यात, कुंडीत लावावीत. पॅन्सीला पाणी आवडते. पण रोप नाजूक असल्याने झारीने पाणी घालावे.

माझ्या लहानपणी लालुंगे ठिपके असलेल्या केशरी रंगाच्या फुलांना आम्ही परीराणी म्हणत असू. पुढे कळले की याचे नाव ‘आयरिस’. आयरिसच्या कंदांना तलवारीच्या पात्यासारखी पाने येतात. पानांचा नाजूक पंखा तयार होतो अन् नाजूक सरळ दांडय़ाच्या टोकाशी येणारी जांभळी, केशरी, पिवळी, पांढरी फुले फार सुंदर दिसतात. आयरिस म्हणजे ग्रीक भाषेत इंद्रधनुष्य, देखण्या फुलास सार्थ असे राजस नाव. कुंडीत वा वाफ्यात याचा कंद लावता येतो. मातीत खोल खळगा करून फूटभर उंचवटय़ावर आयरिसचा कंद ठेवावा व मुळांवर माती घालावी. थोडय़ाशा उंचवटय़ाने कंद कुजण्याची भीती राहात नाही व पाने वर तरारून येतात. फुले येऊन गेल्यावर कंदाची विभागणी करून मित्र-मत्रिणींना द्यावीत. कारण हे कंद रोपवाटिकेत सहज उपलब्ध नसतात. सोनटक्क्याप्रमाणे आयरिसचा उपयोग पाणी स्वच्छ करण्यासाठी करता येतो. याच्या वाफ्यात पुनर्वापराचे पाणी सोडून ते बागेत फिरवता येते. म्हणजे फुलांच्या सौंदर्याबरोबर पाण्याचीही बचत होऊ शकते.

अ‍ॅस्टरसी कुंटुंबाची सर्वच फुले बागेचे सौंदर्य वाढवतात, पण धम्मक पिवळा रंग व मोठ्ठा आकार यामुळे सूर्यफूल बागेस ऊर्जा देते. बियांपासून रोपं तयार होतात, उंच वाढतात. त्यामुळे त्यास छोटय़ा काडीचा आधार द्यावा. सूर्यफुले ही मधमाशा, फुलपाखरे व पक्ष्यांना खूप आवडतात. सूर्यफुलाचा मध्यगोल विलक्षण आकर्षक असतो. याचे कारण त्याची ‘गोल्डन स्पायरल’ मधील रचना व त्या स्पायरलची फिबोनाची संख्या. घरातील मुलांना हे सौंदर्याचे गणित जरूर दाखवावे. सूर्यफुलाची छोटी बहीण ‘क्लेऑपसिस’ची फुले ही वाफ्यात, कुंडीत छान फुलतात. फुले वाळल्यावर बियांपासून रोपे तयार करता येतात. याच्या बियाही बाजारात उपलब्ध असतात.

व्हॅनगोसारखा महान चित्रकार निसर्गातील या सुंदर फुलांवर लुब्ध झाला. १८८९ मध्ये त्याने रंगवलेली आयरिस, पॅन्सी इन बास्केट आणि सूर्यफुलांची मालिका ही स्थिरचित्रे आजही लोकांच्या मनावर अधिराज्य करीत आहेत. या फुलांचे सौंदर्य त्याने अधिकच फुलविले. म्हणूनच निसर्गाचे सौंदर्य नुसते पाहण्यासाठी नाही तर प्रेरणा घेण्यासाठी आहे. त्याने आपले जीवन अधिक श्रीमंत होईल.

प्रिया भिडे (सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)

Story img Loader