लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : घोरावडेश्वर डोंगरावर निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाने गेल्या पंधरा वर्षत हजारो वृक्षांची लागवड केली आहे. ३१ डिसेंबरला वर्षाअखेरीच्या निमित्ताने अनेकजण रस्त्याच्या कडेने, दारुपार्टी करतात, आग पेटवतात. यामुळे वणवे लागतात. त्यासाठी घोरावडेश्वर परिसरात ३१ डिसेंबर रोजी निसर्ग मित्र व वनपाल गस्त घालणार असल्याची माहिती निसर्ग मित्र विभागाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे यांनी दिली.
घोरावडेश्वर डोंगरावर निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाने गेल्या पंधरा वर्षत हजारो वृक्षांची लागवड केली आहे. वर्षभर नियमितपणे संगोपन केल्याने आता काही झाडे वीस फुटांपर्यंत वाढली आहेत. या झाडांना फुलं, फळ यायला लागली असून लहान मोठ्या पशु पक्षांचा वावर वाढला आहे. या वनसंपदेचे तसेच डोंगरावर असलेल्या पशुपक्षांचे, सरपटणाऱ्या लहान मोठ्या प्राण्यांचे नैसर्गिक अथवा मानवनिर्मित वणव्यांपासून संरक्षण करण्यासाठी वर्षभर वनविभागाचे कर्मचारी व निसर्ग मित्र काळजी घेत असतात. तथापि, ३१ डिसेंबरला वर्षाअखेरीच्या निमित्ताने अनेकजण रस्त्याच्या कडेने, दारुपार्टी करतात. आग पेटवतात यामुळे वणवे लागतात तसेच रस्त्यावर अपघात होऊन जीव गमावले जातात. हे टाळण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त संख्येने निसर्ग मित्र व वनविभागाकडील कर्मचारी गस्त घालतात.
आणखी वाचा-विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त
वनविभागाच्या जागेत कोणी पार्टी करताना आढळले. मादक व ज्वलनशील वस्तू घेऊन विनापरवाना प्रवेश केल्याचा कारणांवरून गुन्हे दाखल करुन अटक केली जाते. ३१ डिसेंबर रोजी तसेच यापुढे कधीही रस्त्याच्या कडेने, जंगलात, झाडांच्या आडोशाला पार्टी करु नये. अशा स्वरुपाची पार्टी करणे हा कायद्याने गुन्हा असून कोणी आढळून आल्यास संबंधित विभागाकडून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन निसर्ग मित्र विभागातर्फे करण्यात आले आहे.