केवळ बाजारपेठेची पूजा करून त्यातून प्रगती साधण्याच्या विचारप्रणालीचा पाठपुरावा राज्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे सध्याच्या नव्या अर्थव्यवस्थेत निसर्गाची धूळधाण होत आहे. अशा परिस्थितीत निसर्गाचे जतन करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, असे आवाहन ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी रविवारी केले.
माजी खासदार प्रदीप रावत यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या रावत नेचर अकादमीच्या सार्वजनिक खुल्या ग्रंथालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, ‘आयसर’ चे प्रा. एल. एस. शशिधर या वेळी उपस्थित होते.
गाडगीळ म्हणाले, विज्ञानाचा विपर्यास करून काही वेळा वेगळी मूल्ये मांडली जातात. बाजारपेठेची पूजा करूनच प्रगती साधता येईल अशी एक विचारप्रणाली सध्या आहे. नेतेमंडळीही त्याच विचारसरणीचा पाठपुरावा करतात. पर्यावरणाचा ऱ्हास करून साधलेल्या विकासातून सर्वाची प्रगती होईल, असे सांगितले जाते. विज्ञान ही सर्वात जास्त लोकशाही ज्ञानप्रणाली आहे. पण, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे आज जे सुरू आहे, ते पाहून वाईट वाटते. निसर्गप्रमींसाठी हा दु:खाचा काळ आहे.
रावत यांच्या ग्रंथालयातील विज्ञानविषयक ग्रंथांचा उल्लेख करून डॉ. गाडे म्हणाले, विज्ञानाच्या देशातील भवितव्यासाठी रावत यांची योजना अभिनंदनीय आहे. एकेकाळी शिक्षण व संशोधनात भारत सर्वात पुढे होता. मात्र, ठराविक लोकांपर्यंतच ज्ञान मर्यादित असल्याने ते पुढील पिढीत योग्यप्रकारे पोहोचले नसल्याने आपण हे स्थान टिकवू शकलो नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे विज्ञानाबाबत गोडी निर्माण करण्याचे काम झाले पाहिजे.
रावत म्हणाले, आज माझ्या आयुष्यातील संकल्पपूर्तीचा दिवस आहे. लहानपणाच्या आवडीला आज संस्थात्मक रूप मिळाले, याचा आनंद वाटतो.