पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष ४ जानेवारीपासून सुरू होत आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या औचित्याने वर्षभर विविध उपक्रम करण्यात येणार असून, सौर ऊर्जा प्रकल्प, ई लर्निंग सुविधा, ग्रंथालय संगणकीकरण, स्मार्ट स्वच्छतागृह या प्रकल्पांसह शाळेचा १२५ वर्षांचा इतिहास प्रकाशित करण्याचे नियोजन आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षासंदर्भातील माहिती सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शाळा समिती अध्यक्ष डॉ. प्राची साठे, मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी दिली. शाळेतील शिक्षक धनंजय तळपे, भाग्यश्री हजारे, तनुजा तिकोने, वंदना कदम, अर्चना देव, प्रिया इंदुलकर आदी या वेळी उपस्थित होते. नवीन मराठी शाळेची स्थापना ४ जानेवारी १८९९ रोजी झाली. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बुधवारी (४ जानेवारी) सकाळी अकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला शाळेचे माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, प्रभाकर भावे, ज्येष्ठ उद्योजिका स्मिता घैसास उपस्थित राहणार आहेत.

येत्या काळात सौर ऊर्जा प्रकल्प, पहिली ते चौथीच्या सर्व वर्गांमध्ये ई लर्निंग सुविधा, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा, खतनिर्मिती प्रकल्प, बागेचे नूतनीकरण, ग्रंथालय संगणकीकरण अशा प्रकल्पांसह शाळेचा १२५ वर्षांचा इतिहास प्रकाशित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी निधी संकलन करण्यात येत आहे.

व्हॉट्सॲपद्वारे माजी विद्यार्थ्यांना शाळेशी जोडण्याचा प्रयत्न

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेशी जोडण्यासाठी वेगवेगळ्या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचे मेळावे सुरू करण्यात आले आहेत. त्यात १९५० ते २००५ या वर्षांतील विद्यार्थ्यांचे स्वतंत्र व्हॉट्सॲप समूह तयार करण्यात आल्याने अनेक माजी विद्यार्थी पुन्हा शाळेशी जोडले गेले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navin marathi shala planning to publish 125 years history of the school on the occasion of centenary silver jubilee year ccp14 ssb