नव्या सांगवीतून निवडून आलेल्या नवनाथ जगताप यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊ, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्षभरापूर्वी दिला होता, तो त्यांनी पाळला. शब्द देऊन पाळणारा नेता ही त्यांची ख्याती असून त्यानुसारच ते वागले, अशी प्रतिक्रिया आमदार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी व्यक्त केली. तर, रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर आपला भर राहील, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी या वेळी व्यक्त केली.
पिंपरी पालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची औपचारिकता सोमवारी दुपारी मुख्यालयात पार पडली. एकमेव अर्ज आलेल्या जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर स्थायी समितीच्या सभागृहात जगताप यांचा सर्वपक्षीय नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. आमदार जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, महापौर मोहिनी लांडे, उपमहापौर राजू मिसाळ, पक्षनेत्या मंगला कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदींसह मोठय़ा संख्येने नगरसेवक उपस्थित होते. याचवेळी पालिका मुख्यालयात जगताप समर्थकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती.
सत्कार सभेत अनेक नगरसेवकांनी शुभेच्छापर भाषण करताना ‘मूर्ती लहान व कीर्ती महान’ अशा कोटय़ा करत नवनाथ जगताप यांची फिरकी घेतली. समारोप आमदारांच्या भाषणाने झाला. सांगवी व परिसराच्या विकासाचे श्रेय आपल्याला एकटय़ाला दिले जाते. वास्तविक ते आपल्या एकटय़ाचे नाही. तर, भूमिपुत्र व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आहे, असे आमदार म्हणाले. नवनाथ जगताप यांनीही नागरी सुविधांच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगून सर्वाना बरोबर घेऊन काम करू, अशी ग्वाही दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा