मंदिरे उघडल्यानंतर मागणीत मोठी वाढ
पुणे : नवरात्रोत्सवात मंदिरे उघडल्यानंतर नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली असून तमिळनाडूत पाऊस झाल्याने आवक कमी होत आहे. त्यामुळे नारळाच्या दरात शेकड्यामागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारातही नारळाचे दर वाढले आहेत.
गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवात नारळांच्या मागणीत मोठी वाढ होते. गणेशोत्सवात मंदिरे बंद होती. त्यामुळे नारळ विक्रीवर परिणाम झाला होता. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली. त्यामुळे नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली. तमिळनाडूतील पावसामुळे नारळांची आवक मागणीच्या तुलनेत कमी होत आहे. मागणी चांगली असली तरी घाऊक बाजारात आवक कमी होत आहे. त्यामुळे घाऊक तसेच किरकोळ बाजारात नारळांच्या दरात वाढ झाली असल्याचे मार्केटयार्डातील नारळ व्यापारी दीपक बोरा यांनी सांगितले.
मार्केटयार्डमध्ये तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकातून नारळाची आवक होते. आंध्र प्रदेशातूनही नारळाची अपेक्षेएवढी आवक होत नाही. मागणी वाढली असली तरी आवक अपुरी पडत आहे. दसऱ्यापर्यंत नारळाला चांगली मागणी राहील. दिवाळीतही नारळाच्या मागणीत वाढ होते. निर्बंध शिथिल झाल्यानंतर उपाहारगृहचालक, खाणावळचालकांकडून मागणी वाढली आहे. नव्या नारळाचा वापर पूजा, तोरणांसाठी केला जातो. सापसोल, पालकोल, मद्रास या नारळांचा वापर उपाहारगृहचालक करतात. मिठाई विक्रेत्यांकडून नारळाला मागणी चांगली आहे.
दिवाळीपर्यंत दरतेजी : मार्केटयार्डातील घाऊक बाजारात तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या तीन राज्यांतून दररोज दोन ते अडीच लाख नारळांची आवक होत आहे, मात्र मागणीच्या तुलनेत नारळांची आवक कमी आहे. यापुढील काळात नारळाची आवक सुरळीत झाली तरी दिवाळीपर्यंत नारळाचे दर तेजीत राहतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
तमिळनाडूतील पाऊस आणि मजूर टंचाईमुळे नारळ आवक घटली आहे. मंदिरे उघडल्यानंतर नारळांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. – दीपक बोरा, नारळ व्यापारी, मार्केटयार्ड, भुसार बाजार