विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी
‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ असा गजर करीत आदिशक्तीच्या उत्सवाची भक्तिभावाने गुरुवारी घटस्थापना झाली. विविध मंदिरांमध्ये विधिवत घटस्थापना झाल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महिला वर्गामध्ये उत्साह होता आणि घटस्थापनेनंतर सुवासिनींनी देवीची खणानारळाने ओटी भरली.
पुण्यनगरीची ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये बेंद्रे कुटुंबियांच्या हस्ते सकाळी षोडशोपचार पूजेने घटस्थापना झाली. घटस्थापनेनंतर भाविकांनी दर्शनासाठी आणि सुवासिनींनी ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. दर्शन घेणाऱ्या भाविकांना पावसामध्ये भिजायला लागू नये यासाठी दर्शनबारीच्या जागेवर मंडप उभारण्यात आला आहे. भवानी पेठ येथील भवानी माता मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने षोडशोपचार पूजा करून देवीची घटस्थापना करण्यात आली. नरेंद्र मेढेकर आणि विनायक मेढेकर यांच्याकडे मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी असून उत्सवकाळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराजवळील काळी जोगेश्वरी मंदिर आणि शाहू चौकातील पिवळी जोगेश्वरी येथे पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली.
श्री चतु:शृंगी मंदिरामध्ये सकाळी सहा वाजल्यापासून अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करून सकाळी नऊ वाजता घटस्थापना करण्यात आली. रवींद्र अनगळ यंदाच्या उत्सवाचे सालकरी आहेत. घटस्थापनेनंतर देवीला ४४ तोळे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण करण्यात आले. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी ‘जय मातादी’च्या जयघोषात घटस्थापना झाली. महालक्ष्मी देवीची राजोपचार पूजा, कुंकूमार्चना करून आरती करण्यात आली.
आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी मेघडंबरी उभारण्यात आली आहे. संस्कार वाहिनीचे प्रमुख कृष्णकुमार पित्ती, मंदिराचे संस्थापक राजकुमार अगरवाल, अमिता अगरवाल, भरत अगरवाल, तृप्ती अगरवाल, अॅड. प्रताप परदेशी, राजेश सांकला, शिवा मंत्री या वेळी उपस्थित होते. महालक्ष्मी मंदिरात शुक्रवारी (२२ सप्टेंबर) सकाळी सहा वाजता १५ हजार विद्यार्थ्यांचे श्री सूक्तपठण आणि अथर्वशीर्ष पठण होणार आहे. मात्र, पाऊस असेल तर गणेश कला क्रीडा मंच येथे हा कार्यक्रम होईल.
कात्रज येथील सच्चियाई माता मंदिर, रविवार पेठ येथील चतु:शृंगी माता मंदिर, शनिवार पेठ येथील श्री अष्टभुजा देवी मंदिर, पद्मावती येथील पद्मावती माता मंदिर, तळजाई येथील तळजाई माता मंदिर येथे पारंपरिक पद्धतीने घटस्थापना झाल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. नाना पेठ येथील यंग भोर्डे आळी मित्र मंडळ नवरात्रोत्सवातर्फे सायंकाळी मिरवणूक काढून देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळाने यंदा ‘शिवलिंग महाल’ हा देखावा साकारला असून उत्सवकाळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.