कला, संस्कृती, गायन-वादन आणि नृत्य यांचा संगम असलेल्या २१ व्या पुणे नवरात्र महोत्सवाचे मंगळवारी (१३ ऑक्टोबर) ज्येष्ठ अभिनेते खासदार राज बब्बर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते शिक्षणतज्ज्ञ कर्नल बालसुब्रमण्यम, ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी, ज्येष्ठ कथक नृत्यांगना-गुरू शमा भाटे, लावणी नृत्यांगना आरती नगरकर आणि अभिनेते शिवराज वाळवेकर यांना श्री लक्ष्मीमाता कला संस्कृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर अंजली मनोहर आणि अनिरुद्ध नारवेलकर यांची सतार आणि तबला जुगलबंदी होणार आहे. महापौर दत्तात्रय धनकवडे, सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार वंदना चव्हाण, अनिल शिरोळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, आमदार शरद रणपिसे, दीप्ती चवधरी, अनंतराव गाडगीळ या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती पुणे नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष आणि उपमहापौर आबा बागूल यांनी दिली. शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदिरामध्ये मंगळवारी सकाळी सव्वाआठ वाजता घटस्थापना होणार आहे.
नवरात्रोत्सवामध्ये ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा सदाबहार गीतांचा कार्यक्रम, कव्वाली आणि सुफी गीतांवर आधारित ‘जुनून’, ‘हास्यधारा’ हे कविसंमेलन, ‘ये साई का दरबार है’, लावणी महोत्सव, चित्रपटगीतांवर आधारित ‘रंगीला रे’, ‘दिवसा तू रात्री मी’ हे नाटक, मराठी गीतांवर आधारित ‘स्वरगंध’ आणि हिंदी गीतांवरील नृत्यावर आधारित ‘बॉलिवूड तरंग’ हे कार्यक्रम होणार आहेत.

Story img Loader