अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याप्रकरणी नवाब मलिक सोमवारी पुण्यातील सत्र न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना दहा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. नवाब मलिक यांनी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश गेल्या महिन्यात देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक आज न्यायालयापुढे हजर झाले.
नवाब मलिक यांनी नोव्हेंबर महिन्यात मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बापट यांच्यावर तूरडाळीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. बापट यांनी तूरडाळीचे निर्बंध शिथिल करून डाळ विकण्यास परवानगी दिली होती. जवळपास २ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. त्यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्याची मागणीही मलिक यांनी केली होती. दरम्यान, बापट यांनी त्यांचे वकील अॅड. एस. के. जैन, अॅड. अमोल डांगे, सुनीता किंकर यांच्यामार्फत मलिक यांच्याविरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. जी डाळ जप्त करण्यात आली होती ती ५४० कोटी रुपयांची होती. त्यामध्ये १४० कोटी रुपयांची तूरडाळ होती. मुक्त करण्यात आलेल्या डाळीची किंमत ४३ कोटी रुपये एवढी होती. त्यामुळे या प्रकरणात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. मलिक हे स्वत: मंत्री असताना त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते, असे बापट यांनी दाखल कलेल्या दाव्यात नमूद करण्यात आले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा