पुणे दहशतवाद विरोधी पथकाने नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा नेता के. मुरलीधरन व सी. टी. इस्माईल या दोघांना तळेगाव परिसरातून अटक केली. नक्षलवादी संघटनेच्या मोठय़ा नेत्याला पुण्यातून अटक केल्यामुळे पुण्यावर नक्षलवाद्यांचे लक्ष असल्याचे पुन्हा समोर आले आहे. पुणे शहर व परिसरात छुप्या पद्धतीने राहून नक्षलवादी विचारांचा प्रचार व प्रसार याचबरोबरच तरुणांना या चळवळीकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पश्चिम घाट क्षेत्रात प्रभाव वाढविण्यासाठीचे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणूनही नक्षलवाद्यांनी पुणे शहराकडे लक्ष वळविल्याचे तपासात समोर आले आहे.
के. मुरलीधरन हा नक्षलवादी चळवळीतील मोठा नेता आहे. त्याला अटक केल्यामुळे पुणे परिसरात नक्षलवाद्यांच्या हालचाली सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर येथील संशयित नक्षलवादी अरुण भेलके व त्याच्या पत्नीलाही तळेगाव परिसरातून अटक करण्यात आली होती. भेलके हा पुण्यातील तरुणांना गडचिरोलीच्या जंगलात नेण्या-आणण्याचे काम करीत होता. त्याबरोबरच पुण्यातील तरुणांना त्याने नक्षलवादी चळवळीकडे ओढण्याचे काम सुरू केले होते. तसेच त्याची पत्नी पुण्यातून औषधे व इतर साहित्य जंगलात पुरविण्याचे काम करीत असल्याचे समोर आले होते.
राज्यातील मुख्य नक्षलवाद्यांपैकी एक मिलिंद तेलतुंबडे याची पत्नी अॅन्जेलो सोनटक्के हिला एटीएसने २०११ मध्ये पुण्यातील कबीर कलामंचच्या काही सदस्यांसह अटक केली होती. अॅन्जेलो ही पुणे गोल्डन कॉरिडॉरची प्रमुख म्हणून काम करीत होती. ती या कमिटीची सचिव होती. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पश्चिम घाटात नक्षलवादी आपले बस्तान बसविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी पुणे हे एक महत्त्वाचे शहर आहे. तसेच, जंगलात लागणारी औषधे व इतर साधने या ठिकाणी सहज उपलब्ध होतात. त्याचा पुरवठा करण्यासाठी सुद्धा या शहराकडे लक्ष दिले जात आहे. पुणे परिसरात मोठी लोकसंख्या असल्यामुळे नक्षलवादी आपले नाव आणि वेश बदलून सहज राहू शकतात. गेल्या काही वर्षांत नक्षलवाद्यांच्या परिसरात हालचाली वाढत असल्याचे दिसून येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा