नक्षलवाद ही केवळ राज्याची समस्या असल्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. पण, हा केवळ राज्याचा प्रश्न नाही तर, ती राष्ट्रीय समस्या आहे. नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकारने एकात्मिक उपाययोजना करण्याबरोबरच नक्षलग्रस्त १२ राज्यांच्या मुख्यमंत्री आणि पोलीसप्रमुखांची बैठक बोलवावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार प्रकाश जावडेकर यांनी रविवारी केली.
छत्तीसगढ येथील सुकना गावाजवळ काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात भाजप सहभागी आहे, असे सांगून प्रकाश जावडेकर म्हणाले,‘‘हे गाव महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओरिसा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांच्या सीमेवर असल्याने केंद्राने या प्रकरणाचा एकात्मिक तपास करून नक्षलवाद्यांना पकडावे. गेल्या पाच वर्षांत नक्षलवाद्यांनी भाजपच्या ७० कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. राजकीय नेते, निवडून आलेले स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले करण्याची आक्रमक रणनीती नक्षलवाद्यांनी अवलंबली आहे. बिहारमध्ये तर, कारागृहावर हल्ला करून नक्षलवाद्यांनी आपल्या तीनशे साथीदारांची सुटका केली होती.’’
नक्षलवादी विकासासाठी भांडत नाहीत, तर लोकशाहीविरोधी काम करून हिंसेद्वारे बदल घडवून आणू इच्छितात. विकास प्रकल्प रोखण्याचे काम करीत देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवत आहेत. देशातील १६० जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये छत्तीसगढ येथील हल्ल्याचे काँग्रेस नेत्यांनी राजकारण करू नये, असे आवाहन प्रकाश जावडेकर यांनी केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीतील काही सदस्य नक्षलवाद्यांविषयी सहानुभूती बाळगून आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा
‘आयपीएल’मधील फिक्सिंगमध्ये दोषी खेळाडूंवर केंद्र सरकारने त्वरित कारवाई तर केलीच पाहिजे, पण जावयाला अटक झाल्यानंतर आता बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी खासदार प्रकाश जावडेकर यांनी केली. या देशामध्ये क्रिकेट हा धर्म मानला जात असल्यामुळे या खेळाचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा