नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या तीन विद्यार्थ्यांची पोलिसांच्या विशेष प्रयत्नांमुळे रविवारी सुटका झाली. हे विद्यार्थी मूळचे सातारा जिल्ह्य़ातील असून पुण्यात शिक्षणासाठी वास्तव्यास होते. याकामी नागपूरच्या एका पत्रकाराने महत्वाची भूमिका बजावली आहे.
कराड तालुक्यातील काले येथील आदर्श दीपक पाटील (वय २२), उंडाळे – शेवाळेवाडीचा श्रीकृष्ण पांडुरंग शेवाळे (वय २२) व त्यांचा मित्र विकास ज्ञानेश्वर वाळके (२२, रा. वाघोली, पुणे) हे तीन युवक भारत जोडो अभियानातंर्गत पुणे-भामरागड-दंतेवाडा ते मलखानगिरी अशा महाराष्ट्र-छत्तीसगड-ओदिशा या तीन राज्यांच्या सायकल यात्रेसाठी पुण्याहून निघाले होते.२३ डिसेंबर २०१५ रोजी ते नागपूर येथून निघून गडचिरोली जिल्ह्य़ातील हेमलकसा येथे पोहोचले. छत्तीसगडच्या बिजापूरहून २९ डिसेंबरला बसेगुडा येथे पोहोचले असता सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्यांचे अपहरण केले.
कराडच्या वार्ताहराने दिलेल्या वृत्तानुसार अपहरणाच्या वृत्ताने कराड परिसरात एकच खळबळ माजली. अनेकांनी दूरचित्रवाहिन्यांवर सातत्याने या घटनेचे वृत्त दिले जात होते. त्यातच या तरुणांची सुटका केल्याची बातमी आल्यावर सााऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
आदर्श हा पुण्याच्या एसपी कॉलेजमध्ये इतिहास विषयातून एम. ए. तर श्रीकृष्ण शेवाळे पुणे विद्यापीठात संस्कृत विषयातून एम. ए. करीत आहे. याचबरोबर हे दोघे यूपीएससी व एमपीएससी परीक्षेचा सरावही करीत असून, आदिवासी जीवनाचा अभ्यास हा त्यांचा छंद होता. यातूनच गतवर्षी त्यांनी आदिवासी भागात जाऊन डॉ. बाबा आमटे यांच्या कार्याची पाहणी केली होती. प्रवासादरम्यान ते दररोज पालकांशी मोबाईलबरून संपर्क साधत. २७ डिसेंबरला सायंकाळी उशिरा आदर्शचे आई, वडिलांशी बोलणे झाल्यानंतर मात्र त्याचा मोबाईल बंद झाला. अशातच आज सकाळी आदर्शसह श्रीकृष्ण व विकास वाळके यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याच्या वृत्ताने खळबळ माजली. या तिघांच्या सुटकेसाठी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील, काले येथील पत्रकार संभाजी थोरात व फलटणचे नगरसेवक अनुप शहा यांनी प्रयत्न केले. दुपारी तिन्ही तरुणांची सुटका झाल्यावर आदर्शशी फोनवरून बोलणे झाल्याचे त्याचे काका सुनील मोरे यांनी सांगितले.

Story img Loader