संगणक अभियंता नयना पुजारी खूनप्रकरणातील फरार आरोपी योगेश राऊतला पकडण्यासाठी स्थापन केलेल्या ‘विशेष पोलीस पथकाची’ नेमणूक करून चार महिने उलटले, तरी अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. राऊत पळून गेल्याच्या घटनेला आता दोन वर्ष होत आली असून तो पोलिसांना गुंगारा देत आहे. राऊतचा पोलिसांकडून कसून तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
खराडी येथील सॉफ्टवेअर कंपनीतील इंजिनिअर असलेली नयना पुजारी ८ ऑक्टोबर २००९ रोजी काम संपवून बससाठी थांबली असताना तिला मोटारीत लिफ्ट देऊन तिच्यावर चौघांनी बलात्कार केला होता. त्यानंतर डोक्यात दगड घालून खून केला व राजगुरुनगरजवळील जंगलात मृतदेह टाकून दिला होता. या प्रकरणी योगेश राऊत, महेश ठाकूर, विश्वास कदम आणि राजेश चौधरी यांना अटक करण्यात आली होती. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. खटल्याच्या सुनावणीस सुरुवात झाल्यानंतर आरोपींपैकी राजेश चौधरी याला माफीचा साक्षीदार करण्यात आले व त्याचा कबुलीजबाब नोंदवण्यात आला. खटल्यास सुरुवात झाल्यानंतर उपचारांसाठी राऊतला ससून रुग्णालयात नेले असता सप्टेंबर २०११ मध्ये तो पळून गेला. राऊत हा या गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी असल्यामुळे खटला लांबत गेला.
दरोडा प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या अधिपत्याखाली राऊत याचा तपास करण्यासाठी जानेवारी महिन्यात एक विशेष पोलीस पथक नेमण्यात आले. या पथकाकडे फक्त राऊतला शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या पथकाने राज्यात व राज्याबाहेर जाऊन राऊतचा तपास केला. पोलीस आयुक्तांनी राऊतची माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर राऊतचे छायाचित्र असलेले ‘वॉन्टेड’ पोस्टर पोलीस ठाणे, रेल्वे स्टेशनवर लावण्यात आले आहेत. यावरून पोलिसांशी काही जणांनी संपर्क साधला असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनीही योगेश राऊतला लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी केली. राऊतला वगळून खटला चालविला जात असला, तरी त्याच्या विरुद्धचे पुरावे रेकॉर्ड केले जात आहेत. त्याला अटक झाली, तर खटल्यात सहभागी करून त्याच्यावरही खटला चालवला जाईल, असेही निंबाळकर यांनी सांगितले.

Story img Loader