पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये कार्यरत शास्त्रज्ञ डॉ. विनोद प्रभाकरन यांना लंडनच्या प्रतिष्ठित द रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीकडून फेलो म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.मूळचे केरळचे असलेल्या डॉ. विनोद यांनी बंगळुरूच्या जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च येथून प्रा. सी. एन. आर. राव यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्रात पी.एच.डी. प्राप्त केली. त्यानंतर नेदरलँडमधील टेक्निकल युनिव्हर्सिटी आइंडहोव्हन, डेन्मार्क टेक्निकल युनिव्हर्सिटी, कार्डिफ युनिव्हर्सिटी अशा संस्थांमधध्ये संशोधन केले.

हेही वाचा >>>निगडी, देहूरोड, वाकड परिसरात अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई ; २६ आरोपी अटकेत

२०१० मध्ये ते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. डॉ. विनोद यांचा संशोधन गट पृष्ठभाग विज्ञान संबंधीचा अभ्यास आणि संरचित उत्प्रेरक विकसित करण्याचे काम करत आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून कार्बन डायऑक्साइड कमी करण्यासाठी आणि मिथेनच्या आंशिक ऑक्सिडेशनसाठी उत्प्रेरक विकसनाचेही काम सुरू आहे. डॉ. विनोद यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकांमध्ये शोधनिबंधामध्ये प्रसिद्ध केले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने डॉ. विनोद यांना तंत्रज्ञान संशोधनासाठी सन्मानित केले आहे.