राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष नियुक्तीवरून पक्षात तीव्र असंतोष असल्याचे शनिवारी येथे झालेल्या बैठकीत स्पष्ट झाले. बैठकीत पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या समोरच प्रदेश उपाध्यक्षपदावरील एका पदाधिकाऱ्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे बैठकीत एकच धावपळ झाली. त्यानंतर नाशिकच्या या उपाध्यक्षाची आणि आणखी एका पदाधिकाऱ्याची पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीची प्रदेश स्तरावरील बैठक शनिवारी येथे आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त युवक आघाडीतर्फे सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले होते. या अभियानाचा आढावा या बैठकीत घेतला जाणार होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्याकडील जबाबदारी काढून ती निरंजन डावखरे यांच्यावर सोपवण्याचा निर्णय पक्षाने शुक्रवारी घेतला होता. या पाश्र्वभूमीवर ही बैठक शनिवारी सुरू झाली. बैठकीच्या सुरुवातीला नूतन अध्यक्ष डावखरे यांचा सत्कार राष्ट्रवादी पुणे जिल्हा युवक आघाडीच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर उमेश पाटील यांचे भाषण सुरू झाले.
पाटील यांचे भाषण बैठकीत सुरू असतानाच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धीरज मगर आणि उपाध्यक्ष वैभव देवरे यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. बैठकीत अनपेक्षितरीत्या घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली आणि धावपळ झाली. या प्रकारामुळे बैठकीचे कामकाजही थांबले. इतर कार्यकर्त्यांनी या दोघांकडे धाव घेत त्यांना थांबवले. काही काळ चाललेल्या या गोंधळानंतर बैठकीचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, कार्याध्यक्ष विराज काकडे आदींची या वेळी बैठकीत प्रमुख उपस्थिती होती.
या प्रकारानंतर दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीत जो प्रकार झाला ते पदाधिकारी शिवसेनेतून आलेले असल्याने त्यांनी व्यक्त केलेली नाराजी साहजिकच आहे, असे सांगितले. त्या दोन्ही पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोने घालून घरी बसा!
राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांची सोने मिरवण्याची हौस अद्याप संपलेली नाही, अशा शब्दांत वळसे पाटील यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. समाजातील मोठा वर्ग आपल्यापासून दुरावला आहे. दुरावलेल्या या वर्गाने आपल्याकडील सोने पाहून आपल्या विरोधात मतदान केले आहे. सोने घालण्याची हौस असेल तर ते घालून घरी बसा; पण त्याचे प्रदर्शन करू नका, असेही वळसे पाटील यांनी बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले.

Story img Loader