पुणे : अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको. अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा. अजित पवारांनी भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला असल्याची खदखद भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोरच आढावा बैठकीमध्ये बोलवून दाखवली. या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर आज दुपारपासून व्हायरल झाला. त्यानंतर राजकीय अनेक प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संतोष नांगरे यांनी सुदर्शन चौधरी यांच्या पुणे बाजार समितीच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन केले.

सुदर्शन चौधरी यांनी जाहीर माफी मागावी : संतोष नांगरे

राज्यात महायुतीमध्ये आजपर्यंत वरीष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात आले आहेत.त्यामुळे महायुतीमधील वरीष्ठ नेत्यांबाबत कोणत्याही कार्यकर्त्यांनी चुकीच्या प्रकारची विधान करू नये.त्यामुळे सुदर्शन चौधरी यांनी अजितदादांबाबत जे विधान केले आहे.त्याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही सुदर्शन चौधरी यांना काळ फासणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संतोष नांगरे यांनी दिला.

आणखी वाचा-पुणे: झिकाचा धोका कायम; एरंडवणा, मुंढव्यातील २० जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत भाजपने जाऊ नये ही कार्यकर्त्यांची इच्छा : सुदर्शन चौधरी

मी मागील दहा वर्षापासुन जिल्हय़ात राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपच काम करीत आलो आहे. तसेच आमची दोन दिवसापूर्वी बैठक झाली होती.त्यामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून भूमिका मांडली.त्यामध्ये कुठे ही अजित पवार यांचा अनादर केला नाही किंवा काही चुकीचे देखील बोललो नाही.आपण कायम विरोधात राहू, त्यांच्या सोबत नको अशी भूमिका मांडली.तसेच आताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालया बाहेर येऊन आंदोलन केले आहे.त्यामुळे मी आता यावर अधिक बोलू शकत नाही.पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत भाजपने जाऊ नये,हीच कार्यकर्त्यांची इच्छा असल्याची भूमिका यावेळी सुदर्शन चौधरी यांनी मांडली.