पुणे : शिवसेनेला (शिंदे) शहरातील एकही जागा देण्यात येऊ नये, यासाठी महायुतीमधील राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजपने या मित्रपक्षांनी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. शहराऐवजी जिल्ह्यात दोन जागा देण्यास मित्रपक्षाने सहमती दर्शविली आहे. मात्र, या प्रस्तावाला शिवसेनेने नकार देत शहरात तीन जागांची आग्रही भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे पुण्यात महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेला सन्मानाने जागा मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> शिरुरमध्ये ‘पवारां’च्या विरोधात कोण?

शहरात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. महायुतीमध्ये यातील पाच मतदारसंघ भाजपला मिळण्याची शक्यता असून, दोन जागा राष्ट्रवादी (अजित पवार) आणि उर्वरित एक जागा शिवसेनेकडे जाईल, असा प्राथमिक अंदाज सातत्याने व्यक्त होत आहे. त्यातच ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार, तो मतदारसंघ त्या पक्षाकडे असे जागावाटपाचे प्राथमिक सूत्र महायुतीने निश्चित केले आहे. या सूत्रानुसार शिवसेनेकडे एकही आमदार नाही. त्यामुळे शिवसेनेला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज आहे. त्यातच ताकद जास्त असल्याचे सांगत महायुतीच्या मित्रपक्षांनीही त्यांच्याकडील एक जागा घेण्यासाठी दबावतंत्र अवलंबले आहे. शिवसेनेची शहरात ताकत नाही, त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाहीत, असा दावा मित्रपक्षांकडून केला जात आहे.

गेली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला एकही जागा शहरात मिळाली नव्हती. शिवसेनेने स्वबळावर लढविली होती. त्यानंतर शिवसेनेची दोन शकले झाली. मात्र, शहरात शिवसेनेला मजबूत संघटन मिळाले नाही. उपनगर आणि मध्यवर्ती भागातील काही पदाधिकारी शिवसेनेत गेले असले, तरी अनेक मतदारसंघांत त्यांची ताकत नाही, असा दावा मित्रपक्षांकडून केला जात आहे. त्याऐवजी जिल्ह्यातील भोर आणि पुरंदर हे दोन मतदारसंघ देण्याची तयारी महायुतीमधील मित्रपक्षांनी केली आहे.

हेही वाचा >>> मावळतीचे मोजमाप: महिला-बालकल्याण; लोकसंख्येत निम्म्या असलेल्या महिलांच्या विकासाबाबत निव्वळ चर्चा

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालात वरचष्मा राहिल्यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनी महायुतीमध्ये तीन जागा मिळाव्यात, असा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला होता. हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला मतदारसंघाची मागणी त्यामध्ये करण्यात आली होती. त्यांपैकी हडपसर आणि वडगाव शेरीवर राष्ट्रवादीने (अजित पवार) दावा केला असून, दोन्ही मतदारसंघांत त्यांचे विद्यमान आमदार आहेत. खडकवासला मतदारसंघात भाजपचा विद्यमान आमदार आहे. त्यामुळे शिवसेनेला कोणती जागा मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, महायुतीचे जागावाटप अद्याप झालेले नाही. शिवसेना तीन जागांवर आग्रही आहे. तसा प्रस्ताव यापूर्वीच देण्यात आला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेतेही त्याबाबत सकारात्मक आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये शिवसेनेला निश्चितच अपेक्षित जागा मिळतील, असा दावा शहरप्रमुख प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनी केला.