पुणे / शिरूर : जिल्ह्यातील ‘शिरूर’ विधानसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून, महायुतीमध्ये शिरूरची जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मिळाली आहे. निवडणुकीसाठी पक्षाकडून माऊली कटके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लढत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विरोधात राष्ट्रवादी अजित पवार पक्षात होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

हेही वाचा >>> पुणे : बुलेट दुभाजकावर आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू, बुलेटच्या धडकेत पादचारी ज्येष्ठासह दोघे जखमी

जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघावरून महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. लोकसभा निवडणुकीतही शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपने तयारी केली होती. मात्र, ऐन वेळी हा मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला देण्यात आला आणि अजित पवार यांनी शिवसेनेचे (शिंदे) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षात घेत त्यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नाही. तर, भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप कंद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे शिरूर मतदारसंघासाठी या दोन्ही पक्षात चढाओढ सुरू झाली होती.

हेही वाचा >>> महापौर ते… आमदार, खासदार!

शिरूरची जागा मिळेल, या शक्यतेने राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांना पक्षात घेतले होते. भाजप-राष्ट्रवादीमधील चर्चेनंतर शिरूरची जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मिळाली आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कटके यांच्या नावाची घोषणा केली. शिरूरचे विद्यमान आमदार अशोक पवार यांना महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने उमेदवारी दिली आहे. अशोक पवार यांनी उमेदवारी अर्जही भरला आहे. त्यामुळे शिरूरची निवडणूक पवार विरोधात कटके म्हणजे पर्यायाने राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी अशीच होणार आहे. या निवडणुकीनिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.