पिंपरी : शहराध्यक्षाने विरोध केल्याच्या दुसऱ्याचदिवशी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, मावळातूनही आमदार सुनील शेळके यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून दोनवेळा बनसोडे तर एकदा शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार निवडून आले. आता तिसऱ्यावेळी पुन्हा बनसोडे यांना उमेदवारी मिळाली आहे.
आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी आहेत. ते नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत, प्रभागातील काम करतात, पण नगरसेवकांना विचारत नाहीत, नागरिकांना, पक्षातील पदाधिका-यांना भेटत नाहीत. अशा विविध कारणांमुळे पिंपरीत नवीन चेह-याला संधी देण्याची मागणी हाेऊ लागल्याचे सांगत नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश बहल यांनी बनसोडे यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला होता. महायुतीमधील सर्व पक्षाच्या माजी नगरसेवकांनीही विरोध करूनही बनसोडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
हेही वाचा : पिंपरी विधानसभा: १८ माजी नगरसेवक विरोधात गेल्यास अण्णा बनसोडे म्हणाले, अजित पवार जो निर्णय…
तर, मावळमधून पुन्हा आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी मिळाली आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनीही उमेदवारी मागितली होती. त्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशाेधन परिषदेचे उपाध्यक्षपद नाकारले आहे. ते निवडणूक लढविण्यावर ठाम होते. आता त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.