भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोचरी टीका केली आहे. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे, अशी टीका पडळकरांनी केली. पडळकरांच्या टीकेनंतर अजित पवार गट आक्रमक झाला असून कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी निदर्शनं केली आहेत. दरम्यान, संतप्त कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांचा एकेरी उल्लेख करत घोषणाबाजी केली. तसेच गोपीचंद पडळकर जिथे दिसतील, तिथे त्यांना मारहाण केली जाईल, असा इशाराही अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून दिला आहे.
गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात अंदोलन करताना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘गोप्या पडळकरचं करायचं काय, खाली डोकं वर पाय”, “गोप्या पडळकर, हाय हाय” अशी घोषणा दिल्या. गोपीचंद पडळकर हा नालायक आणि नीच प्रवृत्तीचा माणूस आहे. त्यांनी माफी मागितली तरी आम्ही त्यांना मारल्याशिवाय राहणार नाही, असा धमकीवजा इशारा पुणे जिल्ह्याच्या राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या अध्यक्षांनी दिली आहे.
हेही वाचा- “तुमचा पाळीव कुxx लायकीपेक्षा…”, पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा फडणवीसांना इशारा
गोपीचंद पडळकरांचा एकेरी उल्लेख करत राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले, “गोप्या पडळकर या नालायकाने अपशब्द वापरले आहेत. हा इतका नालायक आणि नीच प्रवृत्तीचा माणूस आहे. प्रत्येक वेळी अजित पवारांवर टीका करायची आणि स्वत:ला मीडियामध्ये कसं मोठं करता येईल, अशा पद्धतीचा प्रयत्न गेली कित्येक वर्षांपासून आम्ही बघतोय. पण आता आम्ही ऐकून घेणार नाही. मी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने सांगतो की, तो (गोपीचंद पडळकर) आम्हाला जिथे दिसेल तिथे आम्ही त्याला झोडणार (चोप देणार) आहोत. त्याला आता सुट्टी नाही. त्याने माफी मागितली तरी आम्ही त्याला झोडणार आहोत. येत्या दोन-चार दिवसात तो आम्हाला दिसणारच आहे. तो जिथे दिसेल तिथे आम्ही त्याला झोडल्याशिवाय राहणार नाही.”
हेही वाचा- “सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाविरुद्ध निर्णय देऊ शकतं”, शिवसेना सत्तासंघर्षावर वकिलाचं मोठं भाष्य
गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?
गोपीचंद पडळकर म्हणाले, “धनगर समाजाबाबत अजित पवारांची भावना स्वच्छ नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही धनगर आरक्षणाबाबत पत्र दिलं आहे.”