मावळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा सर्व प्रकार तळेगाव दाभाडे नगर परिषदेत घडला आहे. मुख्याधिकारी यांच्यासमोरच घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, याबाबत प्रतिक्रियेसाठी बापू भेगडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, बापू भेगडे हे नगर परिषदेत त्यांच्या शिष्टमंडळासह गेले होते. नगर परिषदेने मिळकत करवाढ केल्याने यावर त्यांनी जाब विचारला. करवाढ कशी लागू असेल असा प्रश्न उपस्थितांनी केला. मात्र, महिला अधिकारी यांनी दिलेलं उत्तर उपस्थितांना अवास्तव वाटलं. त्यामुळं बापू भेगडे हे संतापले आणि त्यांनी महिला अधिकारी यांना उद्देशून अर्वाच्च भाषा वापरली. महिला अधिकारी यांनी त्यांना प्रतिउत्तर देत पलटवार केला. तेव्हा, बापू भेगडे अधिकच संतापले आणि त्यांनी खुर्चीवरून उभे राहात महिलेला चांगलंच सुनावले. एकेरी भाषा वापरत शिवीगाळ केली. असे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा – चिंचवड विधानसभेवरून शंकर जगताप आणि आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप समोरासमोर! दोघांनी चिंचवडवर केला दावा

हेही वाचा – पिंपरी : समाविष्ट गावांमधील पाणीपुरवठा विस्कळीत; काय आहे कारण?

महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी असून राज्यात त्यांची सत्ता आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. त्या पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष यांनी अशी भाषा वापरणे अशोभनीय असल्याचं बोललं जातं आहे. या प्रकरणी बापू भेगडेंच्या प्रतिक्रियेसाठी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar group leader used bad language against women in maval incident in talegaon kjp 91 ssb