काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभेची निवडणूक एकत्रित लढविण्याबाबत सोनिया गांधी व शरद पवार यांच्यात चर्चा झाली असली, तरी ऐन वेळी काही अडचण आल्यास गाफील राहू नये, यासाठी राष्ट्रवादीने सर्व २८८ मतदारसंघांतून इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महापौर चंचला कोद्रे, खासदार वंदना चव्हाण, आमदार बापू पठारे, अनिल भोसले, जयदेव गायकवाड, सभागृह नेते सुभाष जगताप तसेच अंकुश काकडे, वसंत वाणी, मदन बाफना, बापूराव कर्णे गुरुजी, श्रीकांत पाटील, सुनील बनकर, प्रकाश म्हस्के, रूपाली चाकणकर, अजित बाबर आदी या वेळी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना उद्देशून पवार म्हणाले, पुणे पालिकेत आपण सत्तेवर असलो, तरी विधानसभेच्या निवडणुकीत आपण फक्त वडगावशेरीतच विजय मिळवू शकलो. पर्वती, खडकवासला व कोथरूडमध्ये आपण कमी पडलो. शहरातील आठही मतदारसंघांतून इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. लोकसभेचा निकाल सर्वाच्याच डोळ्यात अंजन घालणारा आहे, असे सांगून पवार म्हणाले, अच्छे दिन येणार, अशी स्वप्ने दाखविणाऱ्या मोदी सरकारबाबत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस अशा सर्वाचीच दरवाढ होत आहे.
तटकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत गुजरातच्या विकासाचा गाजावाजा करण्यात आला. मात्र, िपपरी- चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जेवढा विकास झाला, तितकाही गुजरातमध्ये होऊ शकला नाही. एखाद्या निकालाने निराश होण्यात अर्थ नाही. लोकसभा व विधानसभेची समीकरणे वेगळी असतात.
पुन्हा चव्हाणसाहेबांच्या पुतळ्यासमोर नाही…
दुष्काळी स्थितीत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याच्या पाश्र्वभूमीवर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘‘माणूस एकदाच चुकतो. त्यामुळे आता आपण तोलून मापून बोलायचे ठरविले आहे. पुन्हा चव्हाणसाहेबांच्या पुतळ्यासमोर आणखी एक दिवस काढायचा नाही.’’ मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत ते म्हणाले, याबाबत भाष्य करणार नाही. पूर्वी आमचे काही विचार होते, पण आम्ही आता ते गुंडाळले असून, आमच्याकडेही आता सामुदायिक नेतृत्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळला दहा हजार कोटी रुपये दिल्याच्या पाश्र्वभूमीवर ते म्हणाले, त्यापैकी थोडे पैसे इकडे दिले असते, तरी पुण्याची मेट्रो झाली असती.
विधानसभेच्या सर्वच जागांसाठी राष्ट्रवादीने इच्छुकांचे अर्ज मागविले
ऐन वेळी काही अडचण आल्यास गाफील राहू नये, यासाठी राष्ट्रवादीने सर्व २८८ मतदारसंघांतून इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
First published on: 11-08-2014 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar meeting election