पिंपरी : शहरातील राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची हॅट्ट्रिक झाली आहे. पहिल्या फेरीपासून बनसोडे आघाडीवर होते. त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत यांचा ३६,६९८ मतांनी पराभव केला.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या परिसराचा समावेश असलेला पिंपरी विधानसभा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा आहे. अनुसूचित जाती (एससी) साठी राखीव असलेल्या या मतदारसंघाची २००९ मध्ये निर्मिती झाली. तेव्हापासून झालेल्या तीन निवडणुकांमध्ये दोनदा राष्ट्रवादी आणि एकदा शिवसेनेने बाजी मारली. २००९ आणि २०१९ मध्ये अण्णा बनसोडे तर २०१४ मध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार निवडून आले. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या शहरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये केवळ पिंपरीची एकमेव जागा मिळाली होती. बनसोडे यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत पक्षाचेच शहराध्यक्ष योगेश बहल, महायुतीमधील घटक पक्षाच्या माजी नगरसेवकांनी त्यांना उमेदवारी देण्यास तीव्र विरोध केला होता. शिवसेनेचे (शिंदे) खासदार श्रीरंग बारणे यांनीही उमेदवार बदलला तर यश मिळेल असे सांगत अप्रत्यक्षपणे बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला होता. त्यानंतरही अजित पवार यांनी बनसोडे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. बनसोडे यांनी अजित पवार यांचा विश्वास यशस्वी करून दाखविला आहे.
हेही वाचा…मावळ ‘पॅटर्न फेल’, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सुनील शेळके विजयी
बनसोडे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. त्यांनी एकदाही मागे वळून पाहिले नाही. पहिल्या फेरीपासूनची आघाडी बनसोडे यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. २० व्या फेरीअखेर बनसोडे यांनी १,०८९४९ मते घेतली. ३६६९८मतांनी विजयी होत त्यांनी हॅट्ट्रिक केली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत यांचा पराभव केला. त्यांना ६९,२५१
मतांवर समाधान मानावे लागले.
हेही वाचा…पिंपरी : मतमोजणीसाठी पिंपरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; किती पोलीस असणार तैनात?
दरम्यान, पिंपरीत २,०४,००५ पुरूष तर १,८७,५६८ महिला आणि इतर ३४ असे ३,९१,६०७ मतदार आहेत. यापैकी १,०५,३९७ पुरूष, ९७,३६० महिला तर इतर नऊ अशा २,०२, ७६६ मतदारांनी ५१.७८ टक्के मतदान केले होते.