पिंपरी : ‘मावळ विधानसभा मतदारसंघात चार कुटुंबांच्या हिताकरिता ‘मावळ पॅटर्न’ आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण लढतीचा दिलेला प्रस्ताव स्थानिक भाजपने फेटाळून अपक्ष उमेदवाराला दिलेला पाठिंबा हा चुकीचा पायंडा आहे. याचे परिणाम राज्यभरात भाेगावे लागतील,’ असा इशारा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांनी दिला.

मावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली आहे. अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले त्याच पक्षाचे बंडखाेर बापू भेगडे यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीनेही भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मावळात गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षांमध्ये माेठी धुसफूस सुरू आहे.
शेळके म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मुंबईत संयुक्त बैठक झाली. महायुतीत उमेदवारीवरून पेच असलेल्या मतदारसंघांमध्ये समन्वयासाठी या बैठकीत प्रयत्न करण्यात आले. मावळातून मला व बाळा भेगडे यांना बोलाविण्यात आले होते. मी पोहोचण्यापूर्वी आधी दहा मिनिटे फडणवीस व बाळा भेगडे यांच्यात चर्चा झाली.

हेही वाचा…पेट्रोल पंपचालकांची दिवाळी यंदा गोड! सरकारकडून कमिशनमध्ये वाढ; भाववाढ नसल्याने ग्राहकांनाही दिलासा

मावळमधील भाजप कार्यकर्त्यांना महायुतीबरोबर राहावे लागेल, असे फडणवीस यांनी भेगडे यांना सांगितले. शेळके यांच्याबरोबर असलेले सर्व वाद विसरून एकत्र या, अशी सूचनाही केली. त्यावर बाळा भेगडे यांनी कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी दोन दिवसांची वेळ मागून घेतली. भाजप कार्यकर्त्यांसमोर महायुतीबरोबर काम करण्याची भूमिका स्पष्टपणे मांडा. महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराच्या व्यासपीठावर जाऊ नका, अशी स्पष्ट सूचना फडणवीस यांनी केली. आपण दिलेल्या माहितीतील एक शब्द जरी खोटा असेल, तर मी उमेदवारी अर्ज मागे घेईन.’