शहरात भरीव विकासकामे करूनही लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागल्याने नाराज असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डागडुजी सुरू केल्यानंतरही पक्षाची घडी अद्याप विस्कटलेलीच आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनातून वेळ काढून अजितदादा रविवारी (२६ जुलै) आकुर्डी येथे नगरसेवकांचा ‘वर्ग’ घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पालिका वर्तुळात सुरू असलेल्या घडामोडी पाहता ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
गेल्या साडेआठ वर्षांपासून िपपरी पालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने शहरात भरीव विकासकामे केली. मात्र, विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे सूत्र वापरले गेले, त्याचे खापर वारंवार राष्ट्रवादीवर फोडले जाते. कामे करूनही राष्ट्रवादीला गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये दारूण पराभवाला सामोरे जावे लागले, त्यामुळे ‘कारभारी’ अजितदादा नाराज आहेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. त्यांच्या उपस्थितीत यापूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, त्यात राष्ट्रवादी नेत्यांच्या मुलांची दुसरी फळी िरगणात उतरवण्यात आली. माजी नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न झाला. आता रविवारी नगरसेवकांची बैठक आहे. नगरसेवकांची अडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न अजितदादा करणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसात पक्षपातळीवर तसेच महापालिका स्तरावरील घडामोडी पाहता नगरसेवकांमध्ये ‘खदखद’ आहे. विकासकामे होत नसल्याने स्थायी समिती सदस्य अस्वस्थ आहेत. येत्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतील अशी नगरसेवकांची प्रभागांमधील कामे रखडलेली आहेत. दुसरीकडे, पालिकेतील भ्रष्ट कारभारावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीला वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी ‘लक्ष्य’ केले आहे. राष्ट्रवादीची संघटना मात्र विस्कळीत असून महापालिका आणि पक्षसंघटना यांच्यातील दरी कायम आहे. या पाश्र्वभूमीवर अजितदादांची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अजितदादा घेणार उद्या नगरसेवकांचा ‘वर्ग’ !
शहरात भरीव विकासकामे करूनही लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागल्याने नाराज असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डागडुजी सुरू केल्यानंतरही पक्षाची घडी अद्याप विस्कटलेलीच आहे.
First published on: 25-07-2015 at 03:07 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp ajit pawar tution pcmc