चर्चेतील प्रभाग : प्रभाग क्रमांक- १०
बावधन-कोथरूड डेपो
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या महापालिका निवडणुकीत तब्बल २९ जागा जिंकत विरोधी पक्षाचे स्थान महापालिकेत मिळविले. पक्षाच्या या वाटचालीत मोठा वाटा राहिला तो कोथरूड विधानसभा मतदार संघातील मनसेच्या विजयी उमेदवारांचा. पक्षाची घटती लोकप्रियता, अनेक विद्यमान नगरसेवकांनी दिलेली सोडचिठ्ठी या परिस्थितीमध्येही कोथरूड विधानसभा मतदार संघातील अनेक प्रभागांवरच मनसेची या निवडणूकतही भिस्त आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक दहा बावधन-कोथरूड डेपो या प्रभागातील मनसेचे विद्यमान नगरसेवक आणि गटनेता अॅड. किशोर शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सभागृहनेता शंकर केमसे यांच्यासाठी ही लढत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कोथरूड विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक दहा बावधन-कोथरूड डेपो या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृहनेता शंकर केमसे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेता किशोर शिंदे बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. भाजप-शिवसेना यांच्यानंतर ताकद असलेल्या मनसेसाठी या प्रभागातील निवडणूक प्रतिष्ठेची आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या प्रभागात आघाडी असली, तरी निवडणुकीत आघाडी धर्म पाळला जाणार का यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे केमसे यांचा विजय अवलंबून राहणार आहे.
महापालिकेच्या प्रभागांची फेररचना झाल्यानंतर या दोघांचा प्रभाग एकच झाला होता. मात्र प्रभागातील परिस्थितीचा आणि पडलेल्या आरक्षणांचा अभ्यास करून या दोघांनी थेट लढत टाळण्याची व्यूहरचना आखली होती. त्यानंतर बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे हे दोघेही एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यातही मनसेसाठीच ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. नव्याने झालेल्या या प्रभागात उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित मतदार मोठय़ा प्रमाणावर आहेत. याच मतदारांच्या जोरावर गेल्या निवडणुकीत कोथरूड परिसरातून मनसेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या अधिक होती.
त्यामुळे यंदाही कोथरूड विधानसभा मतदार संघातील अनेक प्रभागांवर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात काही जागांवर आघाडी झाली आहे. तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. आघाडीत प्रभाग क्रमांक दहामधील चारही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. या प्रभागातील निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मदत होईल, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची अपेक्षा आहे. पण तुलनेने कमी असलेली काँग्रेसची ताकद आणि या प्रभागातून काँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांची संख्या लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसलाही अपेक्षित मदत होणार का, यावर काही गणिते अवलंबून आहेत. पक्षाचे नेते सभागृह नेत्यांच्या मागे किती ताकद लावतात, यावर खूप गोष्टी अवलंबून राहतील.
किशोर शिंदे यांची पत्नी माधवी यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न झाले होते. त्यांचा प्रभाग बदलला आहे. भाजपकडून या प्रभागत चार जणांचे पॅनेल आहे. मात्र खरी लढत ही किशोर शिंदे आणि शंकर केमसे यांच्यातच आहे.
* मनसेचे गटनेता अॅड. किशोर शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, सभागृहनेता शंकर केमसे यांच्यात लढत
* आघाडीत चारही जागा राष्ट्रवादीचे उमेदवार लढणार
* भाजप, शिवसेनेकडून चारही जागांवर उमेदवार