राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित व लाखोंच्या मताधिक्याने विजय मिळवून देणारा मतदारसंघ म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. शरद पवार यांनी याच मतदारसंघात विक्रमी मताधिक्यही घेतले. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनीही मागच्या निवडणुकीत तीन लाखांहून अधिक मताधिक्य घेतले होते. पण, या निवडणुकीत सुळे यांना मताधिक्यासाठी नव्हे, तर विजयासाठीच झगडावे लागले. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांनी मोदी लाटेत त्यांना कडवी झुंज दिली. त्यामुळे सुळे यांचा ६९ हजार ७१९ मतांनी अगदी रडतखडत विजय झाला. बंधू अजित पवारांच्या बारामती विधानसभा मतदारसंघाने साथ दिल्याने ‘ताई’ तरल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून २००४ मध्ये शरद पवार यांना ४ लाख २२ हजारांचे मताधिक्य मिळले होते. २००९ मध्ये सुळे यांना येथून ३ लाख ३६ हजारांचे मताधिक्य होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत निवडून येण्याचा प्रश्नच नाही, तर मताधिक्य किती वाढते, याबाबत उत्सुकता असल्याचे चित्र निर्माण केले जात होते. प्रत्यक्षात मात्र, सुळे यांना विजयासाठी झगडावे लागले. सुळे यांना एकूण ५ लाख २१ हजार ५६२ मते मिळाली. जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मते मिळाली. आम आदमी पक्षाचे उमेदवार सुरेश खोपडे हे २६ हजार ३९६ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
पहिल्या चार ते पाच फेऱ्यांपर्यंत दोघांच्या मतांमध्ये अगदी बोटावर मोजण्याइतपत अंतर होते. त्यानंतरच्या पाच फेऱ्यांमध्ये दोन ते अडीच हजारांचे अंतर होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अवस्थता दिसून येत होती. कुठल्याही क्षणी जानकर हे सुळे यांच्या पुढे निघून जातील अशी स्थिती होती. मात्र, शेवटच्या आठ फेऱ्यांमध्ये सुळे यांचे मताधिक्य ३० ते ६० हजारांवर गेले. मताधिक्य नाही तर नाही, पण पराभवाची नामुष्की तरी ओढविली नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. मतमोजणीच्या या संपूर्ण प्रक्रियेत सुळे या मतमोजणी केंद्राकडे फिरकल्याही नाहीत.
दौंड, पुरंदर, खडकवाला या विधानसभा मतदारसंघामध्ये जानकर यांनी प्रचंड आघाडी घेत सुळे यांना मागे टाकले. इंदापूर, भोर या मतदारसंघातही जानकर यांनी मते घेतली. मात्र, बारामती विधानसभेने सुळे यांना वाचविले. या मतदारसंघात मिळालेल्या १ लाख ४२ हजार ६२८ मतांनी त्यांना रडतखडत का होईना विजय मिळवून दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा