माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ‘कारभारी’ असलेल्या पिंपरी महापालिकेतील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत शनिवारी (१९ सप्टेंबर) बैठक होणार आहे. मंत्री झाल्यानंतर बापट प्रथमच पिंपरी महापालिकेत येत असल्याने भाजप वर्तुळात उत्साह तर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे.
बापट यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात बैठक होत आहे. पिंपरीच्या राज्य शासनाकडे तसेच केंद्राकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांची माहिती पालकमंत्र्यांना दिली जाणार आहे. या बैठकीसाठी शहरातील सर्व खासदार, आमदार व पालिकेतील पदाधिकाऱ्यांना आयुक्तांकडून आमंत्रित करण्यात आले आहे. पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असून आगामी निवडणुकीत ती भाजपला खेचून आणायची आहे. केंद्रात व राज्यात सत्ता असल्याचा फायदा घेऊन पिंपरीतील प्रश्न मार्गी लावण्याचा स्थानिक भाजप नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने त्यांनी मुख्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांकडे सातत्याने तगादा लावला आहे. त्याची दखल घेऊन ही बैठक होत आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करणे, शास्तीकर रद्द यासारखे अनेक महत्त्वाचे विषय शासनाकडे प्रलंबित आहेत. ‘स्मार्ट सिटी’तून पिंपरी-चिंचवडला वगळण्यात आल्याचा विषय ताजा आहे. यावरून भाजपची प्रचंड कोंडी झाली आहे. अजितदादा आणि बापट यांच्यात राजकारणातील अघोषित ‘सामंजस्य करार’ असल्याचे सांगण्यात येते. या पाश्र्वभूमीवर, होणाऱ्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत शहरातील प्रलंबित प्रश्नांची नव्याने उजळणी होणार आहे.

Story img Loader