मोठा गाजावाजा करत ‘बालनगरी’चे भूमिपूजन झाले, प्रत्यक्षात काम सुरू झालेच नाही. तब्बल १५ वर्षे रस्त्यावर डांबरीकरण झाले नाही, सगळीकडे स्वच्छता मोहिमेचे ढोल बडवले जात असताना जागोजागी कचऱ्याचे ढीग आहेत, अशा तक्रारींचा पाढा राष्ट्रवादीचे भोसरी-इंद्रायणीनगरचे नगरसेवक संजय वाबळे यांनी आयुक्त राजीव जाधव यांच्यापुढे वाचला असून विकासाचे मोठे दावे करणाऱ्या पिंपरी महापालिकेच्या ‘दिव्याखाली अंधार’ असल्याचे दाखवून दिले आहे.
भोसरी गवळी माथा ‘जे ब्लॉक’ येथे बालनगरी विकसित करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन ११ जुलै २०१४ ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. मात्र, अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. हे काम मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले. मात्र, कंपनीकडून कामास विलंब होत असल्याचे वाबळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भोसरी एमआयडीसी परिसरातील उद्योजक कोटय़वधी रुपयांचा एलबीटी पालिकेकडे भरतात. मात्र, या परिसरातील रस्त्यांवर १५ वर्षांपासून डांबरीकरण झालेले नाही, खराब रस्त्यांमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपण उद्योगनगरी म्हणवून घेतो आणि उद्योजकच हैराण आहेत, याकडे वाबळे यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
पेठ क्रमांक दोनमध्ये मिनी मार्केट शेजारी रुग्णालयाचे आरक्षण आहे. मात्र, कोणतीच कार्यवाही होत नसल्याने अनेक वर्षांपासून हा भूखंड वापराविना पडून आहे. शहरात सगळीकडे स्वच्छता मोहीम सुरू आहे. मात्र, इंद्रायणीनगरमध्ये दैनंदिन सफाई होत नसल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. प्राधिकरणाकडून भूखंड हस्तांतरित करण्याची प्रक्रिया थंडावल्याने जलतरण तलावाच्या कामाला मुहूर्त लागत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात येणाऱ्या विरंगुळा केंद्राचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यानिमित्ताने ‘सरकारी काम, जरा थांब’ या प्रवृत्तीचा प्रत्यय येतो, असे वाबळे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा