पिंपरीतील पोटनिवडणुकीचे वातावरण तापू लागले असून राजकीय पक्षांनी आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. आमदार गौतम चाबुकस्वार यांनी, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे जातपडताळणी प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करून त्याची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केल्याने राष्ट्रवादीची चांगलीच अडचण झाली आहे.
आमदार चाबुकस्वारांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी १८ जानेवारीला पोटनिवडणूक होत आहे. आमदारांचे बंधू सुनील चाबुकस्वार शिवसेनेचे उमेदवार आहेत. याशिवाय, राष्ट्रवादीचे अरुण टाक, भाजप-रिपाइंचे अर्जुन कदम, काँग्रेसचे संपत ओव्हाळ, मनसेचे राजू भालेराव हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने डावपेचांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार टाक यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे प्रकरण आमदारांनी बाहेर काढले. त्यानंतर, त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी चाबुकस्वार बंधूंनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तर फौजदारी कारवाईची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे ऐन रंगात आलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीची अडचण झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार प्रचारसभेसाठी येणार आहेत. शिवसेनेची बाजू ‘सशक्त’ आहे. मात्र, भाजपच्या पाठबळावर असलेल्या रिपाइंचे कडवे आव्हान शिवसेनेसमोर आहे. निवडणूक जवळ येईल, तशा राजकीय घडामोडी आणखी वेगवान होतील, असे दिसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा